जाहिरात

Mumbai News: मुंबईत मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, BMC च्या आरोग्य अहवालातून माहिती उघड

बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डासांमुळे होणाऱ्या या आजारांमध्ये वाढ होणे हे मान्सूनच्या हंगामी पॅटर्ननुसार अपेक्षित आहे.

Mumbai News: मुंबईत मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, BMC च्या आरोग्य अहवालातून माहिती उघड

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या मान्सून आरोग्य अहवालानुसार मुंबई शहरात या वर्षी डासांमुळे होणाऱ्या रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, याने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत, मुंबईत मलेरियाचे 5706 रुग्ण आढळले, तर मागील वर्षी याच काळात ही संख्या 4021 होती. त्याचप्रमाणे, डेंग्यूचे रुग्ण 1979 वरून 2319 वर पोहोचले आहेत. सर्वात मोठी वाढ चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये झाली असून, 210 वरून ही संख्या 485 वर पोहोचली आहे, म्हणजेच रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(Maharashtra Rain News : यंदा गणेश विसर्जनही पावसात; पुढील 3 दिवस मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचे संकेत)

बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डासांमुळे होणाऱ्या या आजारांमध्ये वाढ होणे हे मान्सूनच्या हंगामी पॅटर्ननुसार अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि सणांमुळे अशा रोगांचे प्रमाण वाढते. या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएमसीनेही पावले उचलली आहेत. लवकर निदान आणि उपचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी 3683 वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एकीकडे या रोगांमध्ये वाढ झाली असताना, दुसरीकडे काही आजारांच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गेल्या वर्षीच्या 553 वरून 471 पर्यंत कमी झाले आहेत. त्याचबरोबर, गॅस्ट्रोएंटेरायटिसचे रुग्ण 6,133 वरून 5,774 वर, तर कोविड-19 चे रुग्ण 1775 वरून 1111 पर्यंत खाली आले आहेत. याउलट, हेपेटायटीसच्या रुग्णांची संख्या 662 वरून 810 पर्यंत वाढली आहे.

(Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर)

सणांमुळे वाढतेय रुग्णांची संख्या

शहरातील डॉक्टरांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. पावसाळ्यातील सण-उत्सव आणि खराब स्वच्छतेमुळे डासांमुळे होणारे आजार या महिन्यातही मोठ्या संख्येने कायम राहतील. मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढले असून, अनेक रुग्णांमध्ये या आजारांमुळे किडनी आणि फुफ्फुसांवर परिणाम होत आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजारांमुळे लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यावर्षी अद्याप या आजारांमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसला, तरी गंभीर प्रकरणांची संख्या वाढली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com