जाहिरात

Pimpri Chinchwad: गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत वर्गातच भलते चाळे

Pimpri Chinchwad Crime News : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी, ५१ वर्षीय वर्गशिक्षक संतोष हरिभाऊ बेंद्रे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad: गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत वर्गातच भलते चाळे

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका वर्गशिक्षकानेच आपल्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी, ५१ वर्षीय वर्गशिक्षक संतोष हरिभाऊ बेंद्रे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोपीला कठोर शिक्षेची शक्यता आहे.

(नक्की वाचा- Kolhapur Crime: डॉक्टरसह 14 शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये लुटले, कोल्हापुरात खळबळ, प्रकरण काय?)

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना ११ जुलै ते १९ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. पीडित मुलीने अत्यंत धाडस करून हा प्रकार उघडकीस आणला. बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित शिक्षक तिच्याशी आणि वर्गातील अन्य विद्यार्थिनींसोबतही असेच अश्लील कृत्य करत होता. मुलीने दाखवलेल्या या धाडसामुळेच हा गंभीर प्रकार समाजासमोर आला आहे.

(नक्की वाचा- Hotel Bhagyashree News: खळबळजनक! 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाचे अपहरण, बेदम मारलं अन् पुलात फेकलं)

या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच असे कृत्य केल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी शिक्षकाची चौकशी सुरू आहे. अन्य विद्यार्थिनींसोबतही असे कृत्य घडले आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. पोलीस तपासात लवकरच सत्य समोर येईल आणि दोषीला कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com