जाहिरात

MVA News: "त्या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत", सुप्रिया सुळेंच्या 'त्या' दाव्यावर काँग्रेसचा तीव्र आक्षेप

Supriya Sule: मतदारसंघांच्या पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकात देशातील लोकसभा आणि विधानसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

MVA News: "त्या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत", सुप्रिया सुळेंच्या 'त्या' दाव्यावर काँग्रेसचा तीव्र आक्षेप

आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी देशातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकात (Delimitation Constitutional Amendment Bill) जर देशातील लोकसभा आणि विधानसभा जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता 'इंडिया' आघाडी आणि महाविकास आघाडीत मतभेद उघड झाले आहेत.

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नुकतीच एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शाह यांच्याकडून मतदारसंघ पुनर्रचना आणि जागा वाढवण्याबाबतचा एक विशेष प्रस्ताव आणण्याविषयी चर्चा झाली होती. सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेदरम्यान केवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेच नाही, तर काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि दक्षिण भारतातील द्रमुक (DMK) पक्षानेही या प्रस्तावाला सकारात्मक होकार दर्शवला होता. 

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जर हे विधेयक मंजुरीसाठी आले, तर त्याला जाहीर पाठिंबा दिला जाईल, असे सुळे यांनी स्पष्ट केले आहे. आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे या संदर्भात पक्षाची अधिकृत भूमिका सविस्तरपणे मांडणार आहेत.

काँग्रेसचा सुप्रिया सुळेंच्या विधानावर आक्षेप

सुप्रिया सुळे यांनी जरी विरोधी पक्षांमधील काही पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असला, तरी काँग्रेस पक्षाने या विधेयकाला आपला विरोध कायम ठेवला आहे. सुळे यांच्या विधानावर काँग्रेस पक्षाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, "सुप्रिया सुळे या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत. त्यामुळे त्या आमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल कोणतेही भाष्य करू शकत नाहीत. काँग्रेसचा या पुनर्रचना विधेयकाला स्पष्ट विरोध आहे." काँग्रेसच्या या भूमिकेमुळे केंद्रात 'इंडिया' आघाडीत आणि महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी'मध्ये मतभेद असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

(नक्की वाचा-  E20 Petrol: नितीन गडकरींच्या बदनामीचा आरोप; 4 यूट्युबर्सवर नागपुरात गुन्हा दाखल)

संजय राऊतांचे स्पष्टीकरण

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांनी बोलताना म्हटलं की, "सुप्रिया सुळे आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी फोनवर बोललो. आपण आपले प्रश्न त्यांनाच विचारले तर योग्य ठरेल. त्या पूर्ण तयारीनिशी येणार आहेत. मी मागील काही दिवसांपासून अशा चर्चा ऐकत आहे की कोण कुठे जात आहे. या सर्व अफवा आहेत."

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, "जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातील कायदेशीर कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. जयंत पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते आहेत. त्यांच्याबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात ज्या काही चर्चा किंवा प्रश्न तुम्ही विचारत आहात, त्यात काहीही तथ्य नाही. त्या केवळ निराधार अफवा आहेत."
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com