
मनोज सातवी
सध्या बारावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. कॉपी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवाय कॉपी करणाऱ्यांवरही कडक कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. असं असलं तरी कॉपी करणारे कॉपी करत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलं आहे. पण त्याच्या ही पुढे जाण्याचा प्रयत्न वसईतल्या परिक्षा केंद्रावर समोर आला आहे. इथं कॉपी ऐवजी थेट विद्यार्थ्याने आपला डमी विद्यार्थीच परिक्षेला बसवला. विशेष म्हणजे या प्रकारात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कनेक्शनही समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वसईत बारावीची परीक्षा देणाऱ्या एका डमी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी फिजिक्सचा पेपर होता. या पेपरला अरबाज असलम कुरेशी हा विद्यार्थी परिक्षा देणे अपेक्षित होते. पण या बहाद्दराने स्वत: ऐवजी अहमद खान हा डमी विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसला होता. परीक्षेमध्ये चाललेल्या या घोळाची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
त्यानंतर त्यांनी वसईतल्या सातीवली तुंगार फाटा येथील ओम साई इंग्लिश हायस्कूल परfक्षा केंद्रावर जाऊन या प्रकाराचा भांडाफोड केला. विशेष म्हणजे मूळ परीक्षार्थी अरबाज असलम कुरेशी हा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा अंबरनाथ शहर विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी डमी विद्यार्थी अहमद खान याला अटक केली आहे. शिवाय त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई मध्ये अशा प्रकारचे डमी विद्यार्थी बसवून परिक्षा पास करण्याचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे. सागर कुरडे या मनसेच्या पदाधिकाऱ्याने हा सर्व प्रकार उघड केला आहे. ही बाब उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सध्या एकाच डमी विद्यार्थ्याला पकडण्यात आलं आहे. अशा प्रकारे अन्य डमी उमेदवार परिक्षा देत आहेत का? हे शोधण्याचे आवाहन आता पोलीसांसमोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world