जाहिरात

भरारी पथकावर खंडणीचा गुन्हा, उल्हासनगर महापालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांसह 2 पोलिसांविरोधात गुन्हा

एका फुल व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम जप्त करण्याची भीती घालत त्याच्याकडून 85 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

भरारी पथकावर खंडणीचा गुन्हा, उल्हासनगर महापालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांसह 2 पोलिसांविरोधात गुन्हा

निनाद करमरकर, उल्हासनगर

उल्हासनगरात अवैधपणे रोख रक्कम पकडण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी एका फुल व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम जप्त करण्याची भीती घालत त्याच्याकडून 85 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांसह दोन पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन आमले नामक फुल व्यापाऱ्याने दसरा आणि दिवाळीसाठी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील फुल व्यापाऱ्यांकडून फुलं खरेदी केली होती. त्याचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यासाठी आमले हे त्यांच्या मित्रासह साडेसात लाख रुपयांची रोकड घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाले होते. यावेळी म्हारळ परिसरातील तपासणी नाक्यावर भरारी पथकाने त्यांची गाडी थांबवून तपासणी केली असता त्यात रोकड आढळून आली. 

(नक्की वाचा - पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करुन जाळलं; चंद्रपुरातील घटनेने खळबळ)

त्यावर आमले यांनी फुलं खरेदी विक्रीच्या पावत्या आणि बिलं त्यांना दाखवत ही रक्कम शेतकऱ्यांची असल्याचं त्यांना सांगितलं. मात्र तरीही भरारी पथकाचे प्रमुख संदीप शिरसवाल यांनी त्यांना तुमची सर्व रोकड जप्त होईल आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी भीती दाखवत त्यांच्याकडून 85 हजार रुपयांची खंडणी उकळली. त्यांच्या या कृत्यात भरारी पथकातील संकेत चनपूर, अण्णासाहेब बोरुडे या दोन कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे यांनीही साथ दिली. 

मात्र याबाबत फुल व्यापारी आमले यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे फोनवरून तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमले हे त्याच मार्गाने परत जात असताना शिरसवाल याने ही रक्कम त्यांना परत केली. दरम्यान, रक्कम जरी परत केली असली तरी खंडणी उकळण्याचा प्रकार मात्र घडला असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या प्रकरणी या सर्वांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा-  फडणवीस, राज ठाकरे, आंबेडकर हे आतून एक, रोखठोक मधून राऊतांनी ठोकून काढलं)

यापैकी संदीप शिरसवाल, संकेत चनपुर आणि अण्णासाहेब बोरुडे हे तिघे उल्हासनगर महापालिकेतील लिपिक असून गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्वांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. तर पोलीस हवालदार विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक राजरत्न बुकटे या दोन पोलिसांविरोधात पोलीस आयुक्तांकडे रिपोर्ट पाठवला असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी सांगितलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com