
यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या उत्सवाला महाराष्ट्रात एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन महत्त्वाचे 'ड्राय डेज' जाहीर केले आहेत. 27 ऑगस्ट हा गणेश चतुर्थीचा दिवस आहे, म्हणजेच गणपतीच्या आगमनाचा दिवस. या दिवशी दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल.
तर 6 सप्टेंबर हा गणपती विसर्जन मिरवणुकीचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. या दिवशीही दारू विक्रीवर पूर्ण बंदी असणार आहे. याव्यतिरिक्त, 5 सप्टेंबर रोजी, म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीही दारूबंदी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, गणपती विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा असे निर्बंध लावले जातात.
(नक्की वाचा- मुंबईतील 12 पूल धोकादायक; गणेशोत्सवादरम्यान भक्तांना काळजी घेण्याचं आवाहन)
गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदीची अंमलबजावणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश स्थापनेच्या दिवशी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू राहणार आहे. यासोबतच सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणुका पार पडतील, त्या मार्गांलगतची दारूची दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश प्रशासनाने दिले आहेत.
(नक्की वाचा- Haritalika Tritiya 2025 Wishes: शिवपार्वतीचे प्रेम म्हणजे निष्ठेचे प्रतीक! हरितालिका तृतीयेच्या खास शुभेच्छा)
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश काढले असून, सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. एकूणच, गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सण शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world