
सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : देशातील प्रमुख आयटी हब असलेल्या पुण्यातील हिंजवडी परिसरातील एक धक्कादायक वास्तव उघड झालंय. हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरच्या अपघातांमध्ये महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतंय. त्यामुळे येथील आयटी अभियंते आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) सिमेंट मिक्सर अपघातात भारती मिश्रा (वय 34) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालाय. त्यामुळे संतप्त नागरिक आणि आयटीयन्सनी अपघातस्थळी पांडवनगर चौकात एकत्र येत पीएमआरडीए (PMRDA), एमआयडीसीसह (MIDC) शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. या अपघातांमध्ये आत्तापर्यंत पाच महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
'निष्पाप बळींना जबाबदार कोण?'
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. 'आम्हाला विकास हवा, मृत्यू नको', 'निष्पाप बळींना जबाबदार कोण?' अशा आशयाचे फलक हातात घेऊन नागरिकांनी सरकारकडे विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरात हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरखाली येऊन 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या घटनांमुळे आयटी अभियंत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील उच्चशिक्षित IT इंजिनियर, बँक कर्मचारी दहशतवादी गटात सहभागी! ATS नं उधळला मोठा कट )
नेमका अपघात कसा झाला?
शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ब्युटीशियन असलेल्या भारती मिश्रा या हिंजवडीवरून मानच्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या. पांडवनगर येथे त्या सिमेंट मिक्सरला ओव्हरटेक (Over take) करत असताना त्यांचा दुचाकीवरील तोल गेला आणि त्या थेट सिमेंट मिक्सरच्या खाली पडल्या. सिमेंट मिक्सर अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन आरोपींना अटक
आंदोलकांनी या घटनेतील संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरचा चालक मोहम्मद अब्बास अल्ताफ आणि सिमेंट मिक्सर प्लॅन्टचा मॅनेजर सचिन हंसराज येवले या दोघांना अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
अवजड वाहतुकीवर बंदी
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हिंजवडी परिसरात सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहतुकीला बंदी आहे. या वेळेव्यतिरिक्त अवजड वाहतूक आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एका महिन्यात अवजड वाहतुकीसंदर्भात 50 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.