Pune News : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगोच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोमवारी रात्री ११ वाजेपासून ते पहाटे २ वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गेट नंबर 9 समोर जमलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. नागपुरला जाणाऱ्या विमान उड्डाणाला तब्बल तीन तास उशीर झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे कंपनीकडून प्रवाशांना बसण्याची देखील व्यवस्था न केल्यामुळे विमानतळावर अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळालं.
यानंतर संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. परंतु कोणीही विमानाचे बोर्डिंग उशीर होत असल्याबद्दल किंवा प्रवाशांना बसवण्यासाठी जागाही उपलब्ध नसल्याबद्दल प्रतिसाद देत नव्हते. प्रचंड प्रमाणात गोंधळ होऊन देखील इंडिगोच्या एकही वरिष्ठ अधिकाऱ्याने येथे भेट दिली नाही. पहाटे 2:00 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं?
रात्री साधारण 12:30 वाजताच्या विमानासाठी गेट क्रमांक तीनवर बोर्डिंग दाखविण्यात आलं होते. परंतु अनाउन्समेंट करून सर्व प्रवाशांना गेट क्रमांक ९ वर बोलावण्यात आलं. गेट क्रमांक ९ समोर अगदी मोजक्या खुर्च्यांची व्यवस्था होती. तेथे बसण्यासही जागा उपलब्ध नव्हती. गेट क्रमांक 9 वर एअर इंडियाचे विमान लागले होते. जर इथे एअर इंडियाचे विमान होते तर इंडिगोच्या नागपूर प्रवाशांना येथे का बोलावले? प्रवाशांनी असा प्रश्न उपस्थित केला. येथे बसण्यास देखील जागा नसल्यामुळे तब्बल दोन तास प्रवासी ताटकळत उभे राहिले. परंतु गेटवरील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची काहीच सोय केली नाही.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर
इंडिगोकडून कारणांमागून कारणं...
अखेर दीड तासानंतर विमान तयार असल्याचं सांगण्यात आलं. परंतु पायलट जयपूरहून आले नाहीत ते पोहोचल्यानंतर फ्लाईट निघेल असे उत्तर देण्यात आले. हे ऐकून प्रवाशांचा संताप अनावर झाला. ज्यांना उभं राहणं शक्य नव्हतं अशा वयोवृद्ध महिला आणि गरोदर मातांनी जमिनीवरच पाय पसरून विश्रांती घेतली. इंडिगोच्या वतीने कुठलीही रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली नाहीच, परंतु अखेरपर्यंत कोणत्याही सेवा-सुविधा, माहिती पुरविण्यात आली नाही. किमान गेट क्रमांक बदलून जेथे आसन व्यवस्था उपलब्ध आहे, तेथे प्रवाशांना पाठवावे इतके देखील सौजन्य दाखवले नाही. बराच गोंधळ झाल्यानंतर शेवटी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी येऊन प्रवाशांना शांत केले. परंतु विमान कंपन्यांच्या वतीने अखेरपर्यंत कोणीही जबाबदारीने उत्तर देण्यासाठी पुढे आले नाही. अखेर पहाटे दोनच्या दरम्यान विमानात जाण्यासाठी गेट क्रमांक नऊ उघडण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
