Jay Pawar Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाहसोहळा सध्या राजकीय क्षेत्रासह सोशल मीडियावरही तुफान चर्चेत आहे. या शाही विवाहसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. रेवतीच्या लग्नसोहळ्यातील जय पवार (Jay Pawar News) यांचाही डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण नेटकऱ्यांकडून जय पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.
रेवती सुळे यांचा शाही विवाहसोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योगपती अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्याशी 20 जून रोजी संपन्न झाला. या शाही विवाहसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. या आनंदाच्या प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेले पाहायला मिळाले. लग्नातील विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(नक्की वाचा : Revathi Sule Marriage: सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी कोण आहेत? वडिलांचे 'भाजप'सोबत आहे खास नातं)
यादरम्यान सुप्रिया सुळे यांचा भाचा आणि अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचाही बहिणीच्या लग्नातील एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जय पवार कुटुंबातील इतर सदस्यांसह आनंदात डान्स करताना दिसत आहेत. बहिणीच्या लग्नाचा आनंदसोहळा साजरा करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
(नक्की वाचा: Revathi Marriage: रेवती सुळेंच्या लग्नात काश्मिरी गर्लची चर्चा? पार्थ यांच्यासोबत दिसलेली कायनात धार कोण?)
नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग आणि टीकेची झोड
जय पवार यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वडील अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबात अद्याप दुःखाचे वातावरण असताना जय पवार अशा प्रकारे जाहीर सोहळ्यात डान्स कसा करू शकतात? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Photo Credit: Social Media
सोशल मीडियावरील युजर्सच्या प्रतिक्रिया- शिवाजी पाटील नावाच्या युजरने लिहिलंय की, "दुःख फक्त कार्यकर्त्यांना आहे. यांना काही घेणंदेणं नाही. राजकारण लई वंगाळ आहे".
- dr_amarsinh नावाच्या युजरने म्हटलंय की, "अजून आमच्या इथल्या दादांच्या कार्यकर्त्यांनी सण केला नाही की पुरणपोळी खाल्ली नाही".
- pritam_bhalerao_18 कमेंट केलीय की, "दादा तुम्ही गेल्याच दुःख फक्त आणि फक्त आमच्यासारख्या जनतेला आहे".
- गणेश कुंद्रे नावाच्या युजरने कमेंट करत म्हटलंय की,"जय दादा हे तुम्हाला शोभत नाही".
जय पवार यांचा व्हायरल व्हिडीओ पाहा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनाला फार काळ झाला नसताना अशा मोठ्या कौटुंबिक सोहळ्यात आनंद साजरा करणे आणि डान्स करणे योग्य नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे काही युजर्सनी कौटुंबिक कार्यक्रमात बहिणीच्या आनंदासाठी सहभागी होणे गैर नाही, अशी भूमिका घेत जय पवार यांची बाजूही घेतली आहे. या संमिश्र प्रतिक्रियांमुळे सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर कमालीचा चर्चेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world