आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामती मतदारसंघ चर्चेत येण्याच्या शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीतून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीतून पवार कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी देऊ शकते.
अजित पवार मागील तीन दशके बारामतीचे आमदार आहेत. मात्र दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते या जागेवरून निवडणूक लढवणार नाहीत, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ही चर्चा होत आहे कारण गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुलगा जय पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याने ते पुन्हा बारामतीतून निवडणूक लढवण्यास कचरत आहेत का? गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघात 47 हजार मतांनी मागे होत्या. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत होत्या.
अजित पवार यांनी स्वत: बारामतीतून निवडणूक न लढवल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते. शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे पक्षाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. म्हणजे बारामतीत दोन भावांमध्येच चुरस पाहायला मिळू शकते.
गेल्या वर्षी अजित पवारांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्यावर जय पवार पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. बंडखोरीनंतर कार्यकर्त्यांच्या पहिल्या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत जय पवारही दिसले होते. दुसरीकडे, युगेंद्र पवार हेही गेल्या वर्षभरापासून अनेकदा शरद पवार यांच्यासोबत फिरताना दिसत आहेत, यावरून ते आगामी निवडणुकीत लाँच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दादा काय करतात पाहावं लागेल- रोहित पवार
यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं की, बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जय यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अजित पवार निवडणूक कुठून लढवणार यावरही चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र लोकसभेनंतर बदललेली समीकरण याचाच हा एक भाग असू शकतो. त्यामुळे दादा आता मुलासाठी काय करताय हे पाहावं लागेल असंही रोहित पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते?
बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकलीही आहे. त्यामुळे यावेळी निडणूक लढण्यास आपण इंटरेस्टेट नाही, असं असलं तरी याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. कोणाला उमेदवारी द्यायचे तेही तेच ठरवतील असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world