निलेश वाघ, मनमाड
सत्तेसाठी दिवसागणिक पक्ष बदलणारे नेते राजकारणाच्या सारीपाटावर पाहायला मिळतात. मात्र एकच पक्ष आणि एकाच चिन्हावर एक दोन नव्हे तर विधानसभेच्या दहा व लोकसभेच्या तीन निवडणुका लढणारा एक व्यक्ती उद्याची होऊ घातलेली विधानसभा निवडणूकही त्याच पक्ष आणि चिन्हावर लढत आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघाचे माजी आमदार कॉ.जिवा पांडू गावित यांनी ही एकनिष्ठा दाखवली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पगडा असलेले जिवा पांडू गावित यांच्याकडे बघितल्यावर पक्षाच्या विचाराचे गारूड काय असते, पक्षनिष्ठा कशाला म्हणतात हे खऱ्या अर्थाने लक्षात येते. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जिवा पांडू गावित यांनी शोषण आणि कष्ट जन्मापासूनच पाहिले आहेत. आई-वडील अशिक्षित, कुठलाही राजकीय वारसा नसतांना केवळ जनता केंद्रबिंदू, मनात सदैव जनतेसाठी लढणाऱ्या गावित यांनी आजपर्यंत दहा वेळा विधानसभा निवडणूक लढवल्या. त्यापैकी सात वेळा त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर तीन वेळा पराभव पदरी आला. मात्र पराभवाने न खचता दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जनतेच्या कामाला सुरवात करतात. विशेष म्हणजे त्यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे. त्यात मात्र त्यांना यश आले नाही. फक्त पक्षाने आदेश दिला म्हणून लोकसभा निवडणुकीला ते तीन वेळा सामोरे गेले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही राजकीय नेते व महापुरुषांचे चारित्र्य त्यांच्या वाचनात आले. त्यात त्यांना कार्ल मार्क्स यांचा विचार भावाला. बीएससीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गवितांनी नोकरी न करता. सर्वसामान्य लोकांसाठी लढण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी सुरगाणा भागात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला. अनेक आदिवासींना न्याय मिळवून दिला. तर वन जमिनीच्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचा लढा आजीवन सुरू आहे. हा लढा लढतना त्यांना अनेकदा जेलवारी करावी लागली.
( नक्की वाचा : महायुती आणि मविआचे जाहिरनामे काय सांगतात? मत देण्यापूर्वी वाचा सर्वांची आश्वासनं )
1978 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तत्कालीन नेते नरेंद्र मालुसरे यांनी त्यांना गळ घातली. त्यावेळी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते ,सर्वांचे आनामत रक्कम जप्त झाली आणि गावित विजयी झाले. त्यानंतर झालेल्या 1980, 1985, 1990 असा सलग तीन सुरगाणा - पेठ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 1995 साली त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा 1999, 2004 साली विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर 2009 साली पुन्हा त्यांचा पराभव झाला. पुढे 2014 साली त्यांनी पुन्हा विजय मिळवला. नंतर पुन्हा 2019 चा निवडणुकीत पुन्हा पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा ते विधानसभा लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
( नक्की वाचा : लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार? )
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महविकास आघाडीकडून त्यांना शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. खासदारकी चालून आली असताना गावित यांनी पक्षनिष्ठा, तत्व व विचारधारेला बांधील राहत नम्रपणे ही ऑफर नाकारली. आजच्या काळात असा एकनिष्ठ , पक्षनिष्ठा बाळगणारा नेता मिळणे तसे दुरापास्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world