आगामी विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election) तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. ऐन निवडणुकीत आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे. पुढील तीन दिवस आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे. 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआकडून तयारी सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असून यावेळेस निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार फुटल्याने काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेना पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे संख्याबळ नसताना भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणला होता. यंदा विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली आहे.
12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी, महायुतीला मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे आपल्याकडील मते फुटू नयेत याची दक्षता सर्वच पक्ष घेत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॉटेलवर राहणार आहेत. 10, 11 आणि 12 जुलै रोजी ठाकरे गटाच्या 16 आमदारांचा हॉटेलवर मुक्काम असणार आहे. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे हॉटेलमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं, विधानसभा निवडणुकीसाठी 'या' उमेदवाराची एन्ट्री
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करण्यात आले असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवार आहेत. तसेच पक्षासाठी स्वतःची हक्काची 43 मतं आहेत. अजूनही राष्ट्रवादीला 2 उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीला उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित झाला आहे.
भाजपकडून घेतली जातेय खबरदारी
उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजप आणि शिंदे गटानं देखील सावध पाऊलं उचलली आहेत. भाजपच्या सर्व आमदाराना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते. तर शिंदे गटाच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात कसलाच दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world