Maharashtra Budget 2026: पुणे शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शहराच्या विकासाला नवी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठी खजिन्याची तिजोरी खुली केली आहे. विशेषतः पुणे मेट्रो टप्पा 2 वर देण्यात आलेल्या जोरामुळे पुणेकरांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीपासून ते थेट जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान केंद्रापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणांनी या अर्थसंकल्पात पुण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
पुणे मेट्रो टप्पा 2 चा विस्तार आणि नवीन मार्ग
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला या बजेटमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. खडकवासला ते स्वारगेट आणि हडपसर ते खराडी या मार्गाचा विस्तार करताना आता हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय रामवाडी ते वाघोली या 11 किमी लांबीच्या मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील मिळाला असून, यामुळे नगर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किमी लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, यामुळे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणे सोपे होईल.
( नक्की वाचा : Maharashtra Budget : ठाणे ते बोरिवली प्रवास सुसाट! वडाळा ते गेट वे मेट्रो, बजेटमधून मुंबईकरांना मोठं गिफ्ट )
रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पांचा धडाका
पुणे आणि लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 5100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. याचा थेट फायदा पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव परिसरातील नागरिकांना होणार आहे. तसेच पुणे ते शिरूर दरम्यान 53 किमीचा उन्नत मार्ग 7514 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे.
तळेगाव-चाकण उन्नत मार्ग आणि चाकण-शिक्रापूर मार्गाचे सहापदरीकरण यामुळे औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक अधिक वेगवान होईल. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या 192 किमीच्या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी 14886 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )
पुरंदर विमानतळ आणि सिंचन प्रकल्पांना गती
पुणे जिल्ह्याच्या विमान वाहतुकीला बळकटी देण्यासाठी पुरंदर विमानतळासाठी विशेष उद्देश वाहन अर्थात एसपीव्ही (SPV) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या विमानतळाच्या कामाला आता वेग येणार आहे.
शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी निरा-कर्हा नदीजोड प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाचे जतन
पुण्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतूद आहे. आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या विकासासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच जगदगुरु तुकाराम महाराज यांचे देहू येथील जीर्ण घर आणि त्यांच्या जन्मस्थानाच्या जतन आणि संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार केला जाणार आहे. यामुळे भाविक आणि पर्यटकांना आधुनिक सुविधांसह ऐतिहासिक ठेवा पाहता येईल.
रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप
पुणे आणि मुंबईला जागतिक स्तरावर नेण्यासाठी येथे 50 अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) केंद्र उभारले जाणार आहे. या माध्यमातून 30 लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीन 400 जागतिक क्षमता केंद्रे (GCC) आणि नवउपक्रम शहरांची उभारणी केल्यामुळे पुणे हे भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world