जाहिरात

MHADA Lottery: 25 वर्षांची प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या विजेत्यांसाठी ठाण्यात पुन्हा लॉटरी

म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली ही लॉटरी काढली होती. यामध्ये चितळसर, ठाणे येथील अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) सुमारे 200 घरांचा समावेश होता.

MHADA Lottery: 25 वर्षांची प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या विजेत्यांसाठी ठाण्यात पुन्हा लॉटरी

MHADA Lottery: सामान्य नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा सातत्याने विविध लॉटरी योजना जाहीर करते. मात्र, अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे या योजनांमध्ये विलंब होतो. असाच काहीसा अनुभव 25 वर्षांपूर्वी ठाणे चितळसर येथील घरांसाठी लॉटरीत विजेते ठरलेल्या नागरिकांना आला होता. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या या 156 विजेत्यांसाठी आता मोठा आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विजेते ठरलेल्या घराचं वाटप करण्यासाठी पु्न्हा एकदा लॉटरी करण्यात येणार आहे.  

म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली ही लॉटरी काढली होती. यामध्ये चितळसर, ठाणे येथील अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) सुमारे 200 घरांचा समावेश होता. या लॉटरीनुसार, एकूण 156 अर्जदारांना या योजनेत घरे लागली होती आणि त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत होते. मात्र, या प्रकल्पाच्या भूखंडावर महापालिकेचे काही आरक्षण असल्याच्या तांत्रिक कारणास्तव ठाणे महानगरपालिकेने या घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या ठिकाणी घरे उभी राहू शकली नाहीत आणि विजेत्यांना आपल्या घरासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली.

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad: गुगल मॅपच्या मदतीने घरफोडी, पोलिसांचाही स्मार्ट तपास; दोघांना अटक)

प्रकल्प रखडल्यानंतरही म्हाडाने लॉटरीत विजेते ठरलेल्या या 156 अर्जदारांकडून घेतलेली अनामत रक्कम त्यांना परत केली नव्हती. या निर्णयामुळे त्यांचा घराचा हक्क कायदेशीररित्या अबाधित राहिला होता. ज्यामुळे ते सातत्याने आपल्या घरासाठी पाठपुरावा करत होते. दरम्यानच्या काळात म्हाडाने अथक प्रयत्न करून हा तांत्रिक अडथळा दूर केला. या अंतर्गत 27 मजली असलेल्या एकूण 7 इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी एक संपूर्ण इमारत 2000 सालच्या लॉटरीत विजेते ठरलेल्या या 156 अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर गाडी थांबताच नवरी फरार; शेतकरी नवऱ्याची लाखोंची फसवणूक)

सदनिका वाटपासाठी नवी लॉटरी

जरी ही घरे उपलब्ध झाली असली तरी, 156 विजेत्यांपैकी कोणाला कोणत्या मजल्यावरची आणि कोणत्या क्रमांकाची सदनिका मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यामध्ये कोणताही वाद होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी म्हाडा 'लॉट' पद्धतीने सदनिकांचे वाटप करणार आहे. म्हणजेच, ही लॉटरी 'विजेता निवडण्यासाठी' नसून, 'सदनिका वाटपासाठी' असेल. लवकरच ही वाटप प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com