ऋतिक गणकवार, मुंबई
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अंधेरी पूर्व येथील 'के-साऊथ' प्रभागातील दोन कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणातील तक्रारदार हे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सेवेमध्ये 'कायमस्वरूपी' करण्याचे आदेश काढण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.
(नक्की वाचा- Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)
आरोपींमध्ये योगेश सावंत जे प्रभारी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक (घनकचरा व्यवस्थापन विभाग, के-साऊथ वॉर्ड) आणि सुशांत गमरे, कामगार (घनकचरा व्यवस्थापन विभाग, के-साऊथ वॉर्ड) यांचा समावेश आहे.
(नक्की वाचा- Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात)
लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
सफाई कामगाराचे कायमस्वरूपी आदेश काढण्याच्या बदल्यात या दोघांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 10 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचला आणि 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश सावंत आणि सुशांत गमरे या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world