Mumbai News: लालबागचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी नाकारल्याने उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केला. या बंडामुळे लालबागमध्ये शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने वॉर्ड क्रमांक 204 मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या ऐवजी किरण तावडे यांना उमेदवारी जाहीर केली. किरण तावडे हे 'मुंबईचा राजा' गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर अनिल कोकीळ यांनी बंडाचं निशाण फडकावतं अर्ध्या तासात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी देखील त्यांनी वॉर्ड क्रमांक 20 साठी अधिकृत 'एबी फॉर्म' सुपूर्द केला.
(नक्की वाचा- KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच भाजपचे 2 उमेदवार विजयी; कोण आहेत पहिले नगरसेवक?)
ज्येष्ठ शिवसैनिकाचा संताप
अनिल कोकीळ यांच्या या निर्णयामुळे लालबाग येथील जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. एका ज्येष्ठ शिवसैनिकाने तर कोकीळ यांनी यापूर्वी वाटलेली बॅग आणि इतर साहित्य सर्वांसमोर जाळून टाकले. "गद्दाराला हाकलून द्या, त्याला कुठेही उभे करू नका," अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.
विजयाचा गुलाल आम्हीच उधळू- अनिल कोकीळ
पक्षांतराबाबत बोलताना अनिल कोकीळ म्हणाले, "मी आधी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो आणि उमेदवारी मागितली होती. कारण मी याआधीही नगरसेवक म्हणून काम केले आहे. मात्र, त्यांनी मला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि त्यांनी मला संधी दिली. स्थानिक राजकारणात काय घडले हे आता सांगणार नाही, पण विजयाचा गुलाल आम्हीच उधळू."
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
परळ-लालबागमध्येआता या प्रभागात ठाकरे गटाचे किरण तावडे विरुद्ध शिंदे गटाचे अनिल कोकीळ अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार आणि शिवसैनिक 'निष्ठा' जपणार की 'परिवर्तन' घडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world