
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पावसाळी नियोजनानुसार, सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या लघु उदंचन केंद्र परिचालकांनी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याने तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केली नाही, या कारणाने त्यांना प्रत्येकी १० लाख रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी लघू उदंचन केंद्र परिचालकांकडून प्रत्येकी १० लाख रूपये म्हणजेच एकूण ४० लाख रूपये दंड ठोठावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागरी भागात पावसाचे पाणी साचू नये, सखल भागांमध्ये साचणारे पावसाचे पाणी उपसून वाहून नेता यावे, पर्यायाने रस्ते वाहतूक सुरळीत राहावी तसेच पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र (Mini Pumping Station) उभारली आहेत. या केंद्रांचे परिचालन कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्ती देखील ठरवून देण्यात आल्या आहेत. दिनांक २५ मे २०२५ पर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मुंबई महानगरात काल (सोमवार, दिनांक २६ मे २०२५) रोजी मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली. सततच्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत होती.
( नक्की वाचा : Mumbai Metro : पावसाळ्यात मेट्रो रेल्वे सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार, वाचा काय करणार उपायययोजना? )
या पावसामध्ये, हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथे अतिसखल भागात जोरदार पावसाने पाणी होते. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नेमलेली लघू उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने व वेळेत कार्यान्वित झाली नाही, असे आढळून आले. याचा विपरित परिणाम म्हणून, हिंदमाता आणि गांधी मार्केट सारख्या परिसरात वाहतूक व जनजीवन बाधित झाले. तसेच, मस्जिद उपनगरीय रेल्वे स्थानक परिसरांमध्ये काही मिनिटे पाणी साचून उपनगरीय रेल्वेच्या संचालनात अडथळा उद्भवला. चुनाभट्टी येथे फारसा पाऊस झाला नसला तरी याठिकाणी पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हते. याची दखल घेऊन परिचालकास दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र परिचालकांना निविदा अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याचा, पुरेशा क्षमतेने व वेळेत यंत्रणा कार्यान्वित केली नाही, असा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येकी १० लाख रूपये याप्रमाणे एकूण ४० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पावसाळी नियोजनानुसार नेमून दिलेल्या कामकाजात, कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world