जाहिरात

Mumbai Metro : पावसाळ्यात मेट्रो रेल्वे सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार, वाचा काय करणार उपायययोजना?

Mumbai Metro : पावसाळ्यात मेट्रो रेल्वे सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार, वाचा काय करणार उपायययोजना?
मुंबई:

पावसाळ्यात सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि मेट्रो सेवेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पावसाळ्यातील महत्त्वाच्या उपाययोजना
१. मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी अ‍ॅनिमोमीटर' बसविण्यात आले असून हवामानाची सद्यस्थिती सतत तपासून निर्णयक्षमता अधिक सक्षम करण्यात आली आहे.
२. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी आणि प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी मेट्रो सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
३. प्रत्येक मेट्रो स्थानकात किमान ६४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षा आणि देखरेख यासाठी २४x७ नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
४. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देता यावा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोच सज्ज ठेवण्यात आला आहे.
५. डीजी सेट्स, यूपीएस यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, अर्थिंग सिस्टीम्स आणि डीवॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून ३० स्थानके आणि चारकोप डेपो येथे ही साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
६. सर्वच्या सर्व ३४ मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली असून मुसळधार पावसातही गळती होणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक असेल, हे सुनिश्चित केले आहे.
७. संपूर्ण ३५ किमी लांबीच्या व्हायाडक्टची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये रूफ गटर्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि ३० स्थानकांवरील ड्रेनेज लाइन यांचा समावेश आहे.
८. ३४ स्विचगियर युनिट्समध्ये २५ केव्ही केबल्स (तीन रिसिव्हिंग सबस्टेशन्सपासून फीडिंग पोस्टपर्यंत), ट्रान्सफॉर्मर बुशिंग्ज, सीटी, पीटी, लाइटनिंग अरेस्टर्स, न्यूट्रल आयसोलेटर आणि हीटर यांसह ७५९ हून अधिक इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्सची प्रतिबंधात्मक देखभाल व तपासणी पूर्ण करून संपूर्ण यंत्रणेमधील विद्युत सुरक्षेची खात्री करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : विकसित भारत-2047 चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र काय करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला रोडमॅप )
 


प्रत्यक्ष कार्यस्थळावरील तयारी अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे पार पडतील याची खातरजमा हे अधिकारी करतील. खड्डे भरण्यासाठीची वाहने आणि पाणी उपसण्यासाठीचे पंप महत्त्वाच्या ठिकाणी अगोदरच तैनात करण्यात आले आहेत. तसेच, पावसाळ्यात पादचारी व वाहनांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांभोवती ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले असून सुरक्षितता आणि सुरळीत सेवेची खात्री करण्यात आली आहे.

प्रगत पावसाळी नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत असून, या कक्षात थेट लाइव्ह मॉनिटरिंगची सुविधा आहे आणि हा कक्ष मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडण्यात आला आहे. आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक (१८००८८९०५०५ / ०८०८ आणि ८४५२९०५४३४)  २४ तास उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com