राहुल वाघ, नाशिक
Nashik News : नाशिक शहरात अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीसह 9 वर्षांच्या चिमुरड्याचे अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून अपहरण केले आहे. याप्रकरणी नाशिकच्या अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिडको परिसरातील पहिली घटना
सिडकोतील आनंदनगर परिसरात राहणारी एक तरुणी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली, मात्र ती परतलीच नाही. पालकांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडलीच नाही. कोणा अज्ञात व्यक्तीने तिला कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरू आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
जय भवानी रोडमधील दुसरी घटना
नाशिकरोड येथील जेतवननगर भागात राहणारा 9 वर्षांचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला आहे. हा मुलगा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. तो अद्याप घरी न परतल्याने कुटुंबियांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या चिमुरड्याला देखील अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)
पोलीस प्रशासनाचे आवाहन
एकाच वेळी शहराच्या दोन वेगळ्या भागातून अशा प्रकारे मुले बेपत्ता झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आणि आपल्या पाल्यांची माहिती अनोळखी व्यक्तींना न देण्याचे आवाहन पालकांना केले आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातील पथके बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world