
राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai construction site accident :नवी मुंबईतील उलवे सेक्टर 26 येथील 'ट्रायसिटी कन्स्ट्रक्शन' साईटवर 6 मार्च 2025 रोजी घडलेल्या अपघातात एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता. तो मृत मजूर बांगलादेशी होता का? असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित होता.
या प्रकरणावर प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी उलवे परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने आरोप केला जात आहे की, उलवेतील अनेक बांधकाम साईट्सवर बेकायदेशीररीत्या बांगलादेशी नागरिक मजुरी करत असून, या मजुरांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे मृत मजूर? अंतिम विधी कुठे, कोणी केला?
मजुराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार कोणत्या कबरस्तानात झाले, की स्मशानभूमीत, यावरही प्रश्न निर्माण झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन किंवा सिडकोकडे याबाबत कुठलीही नोंद नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. मृत मजूर कोण होता, कुठून आला होता, याची शहानिशा अजूनही झालेली नाही.
परिसरात बांगलादेशींचे वाढते वास्तव्य?
स्थानिक नागरिकांनी केलेल्या निरीक्षणानुसार, उलवे परिसरातील विविध बांधकाम साईट्सवर झोपडीनुमा पत्र्यांच्या घरांमध्ये राहणारे अनेक मजूर हे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडे भारतीय ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले असून, हे लोक दलालांमार्फत कामावर लावले जात असल्याचेही सांगण्यात आले.
( नक्की वाचा: Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )
व्यावसायिकांकडून ओळख तपासणी नाही
बांधकाम व्यावसायिकांकडून मजुरांची ओळख तपासणी करताना नियमांचं पालन केलं जात नाही. दलालांच्या माध्यमातून मजूर आणले जातात, मात्र त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी केली जात नाही. या पद्धतीमुळे बेकायदेशीर परदेशी नागरिकांना देशात वास्तव्य व रोजगार मिळतो, हे अत्यंत धोकादायक असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.
या सगळ्या प्रकारावर नवी मुंबई पोलीस, सिडको, विदेशी नागरिक विभाग किंवा महापालिकेकडून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. उलवे परिसरात बेकायदेशीर परदेशी नागरिक राहतात का, याची चौकशी करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नाही.
कामगार विभागाच्या आदेशांनंतरही सुरू काम?
मिळालेल्या माहितीनुसार, या साईटवरील काम नियमानुसार नाही. कामगार आयुक्त कार्यालयाकडून पोलिसांना व सिडकोला लेखी सूचना दिल्यानंतरही संबंधित बांधकाम सुरूच आहे. या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे प्रशासनावरही संशयाचे सावट आहे.
( नक्की वाचा: Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या! )
नागरिकांच्या मागण्या काय?
या प्रकारानंतर उलवे आणि संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांनी खालील प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत:
- 1. सर्व बांधकाम साईट्सवर राहणाऱ्या मजुरांची ओळख व नागरिकत्व तपासण्यात यावं.
- 2. बेकायदेशीर बांगलादेशी किंवा इतर परदेशी मजुरांविरुद्ध 'Foreigners Act' अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.
- 3. बांधकाम व्यावसायिकांकडून मजुरांची संपूर्ण वैध माहिती व कागदपत्रांची पूर्तता सक्तीची करावी.
- 4. पोलिस व महानगरपालिकेने संयुक्त मोहिम राबवून झोपड्या, पत्रे आणि बेकायदेशीर वास्तव्याची छाननी करावी.
उलवेतील मृत्यूची घटना ही केवळ एक अपघात नाही, तर नवी मुंबईतील बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम क्षेत्रातील बिनधास्तपणा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा भेदक आरसा आहे. जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर उद्याचा धोका अजून मोठा असू शकतो, असं मत व्यक्त केलं जात आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि कायद्याच्या राज्यासाठी नवी मुंबईत परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य थांबवणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, चौकशी सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच नवी मुंबईकरांची मागणी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world