जाहिरात

Navi Mumbai Crime News: सोशल मीडियाच्या नावाखाली खंडणीचे रॅकेट, बोगस पत्रकाराला अटक

काही दिवसांपूर्वी एपीएमसी भागातील एका पुरी भाजी विक्रेत्याने परमेश्वरच्या जाचाला कंटाळून पोलिसांत  तक्रार दाखल केली होती.

Navi Mumbai Crime News: सोशल मीडियाच्या नावाखाली खंडणीचे रॅकेट, बोगस पत्रकाराला अटक
नवी मुंबई:

नवी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसी (APMC) परिसरात स्वतःला पत्रकार भासवून दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत खंडणीखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परमेश्वर प्रकाश सिंग ऊर्फ मोनू (31) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे सोशल मीडियाचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. आरोपीवर 8 गंभीर गुन्हे आणि 11 अदखलपात्र (NC) गुन्हे दाखल असून, त्याच्या गुन्हेगारीचा विस्तार उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेला आहे.

नक्की वाचा: संशयाच्या भुताने घेतला तरुणाचा बळी; भर मार्केटमधील थरारक घटनेने जळगाव शहर हादरले

अवैध धंदे करणाऱ्यांवर ठेवायचा नजर

परमेश्वर सिंग याने खंडणी उकळण्यासाठी एक विशिष्ट 'पॅटर्न' तयार केला होता. त्याने 'एनएमटी न्यूज' (NMT News) नावाचे एक सोशल मीडिया हँडल सुरू केले होते. या चॅनेलच्या नावाखाली तो एपीएमसी बाजारपेठेतील टपरी चालक, पथ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर लक्ष ठेवायचा. एखादा व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसताच, तो त्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकायचा. केवळ पोस्ट टाकून तो थांबत नसे, तर त्या पोस्टचा आधार घेऊन तो संबंधित महापालिका विभाग किंवा पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करायचा. एकदा का प्रशासकीय कारवाईचा धाक बसला की, मग तो संबंधित व्यावसायिकाकडे 'सेटलमेंट'साठी जायचा. "यापुढे तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि मी तुमच्या विरोधात तक्रार करणार नाही, या बदल्यात मला दरमहा ठराविक रक्कम हवी," अशी मागणी तो करायचा. अशा प्रकारे त्याने डझनावारी व्यावसायिकांकडून महिना वसुली सुरू केली होती.

पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर थेट पोलीस यंत्रणेलाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा काही तक्रारदारांनी त्याच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली, तेव्हा त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून पोलिसांच्या तपासकामात अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. "मी पत्रकार आहे, तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकत नाही," असे धमकावून तो पोलिसांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून दबाव टाकत असे. पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून तो तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करायचा.

नक्की वाचा: निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत खळबळ! पंजाबच्या 25 आरोपींना केली अटक, काय आहे प्रकरण?

मजूर बनला खंडणीखोर

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात परमेश्वर सिंग याचा गुन्हेगारी इतिहास उघड झाला आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून तिथेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर न्यायालयात एका प्रकरणादरम्यान त्याने आपण कोणताही पत्रकार नसून केवळ एक मजूर आहोत आणि ठेकेदाराकडे काम करतो, असे लेखी प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, नवी मुंबईत येताच त्याने पुन्हा एकदा 'पत्रकार' असल्याचे सोंग घेऊन खंडणीचे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली. सुरवातीच्या काळात त्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांशी जवळीक साधून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून त्याचा गुन्हेगारी कारभार सुकर होईल.

पुरी भाजीवाल्याची तक्रार

काही दिवसांपूर्वी एपीएमसी भागातील एका पुरी भाजी विक्रेत्याने परमेश्वरच्या जाचाला कंटाळून पोलिसांत  तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीने तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावणे सुरूच ठेवले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि उपायुक्त पंकज डहाणे यांनी तातडीने अटकेचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून परमेश्वर सिंगला अटक केली. या गुन्ह्यात त्याच्या भावाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com