
राहुल कांबळे, नवी मुंबई
Navi Mumbai : तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या रासायनिक कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या कंपन्या शुद्धीकरण न केलेले घातक रसायनथेट नदीपात्रात सोडत असल्याचा दावा गावकरी करत आहेत. यामुळे परिसरातील भूजलस्रोत आणि शेती गंभीरपणे दूषित झाली आहे.
या प्रदूषणामुळे नागरिकांना अतिसार, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. गोटगाव आणि तळोजा वसाहतीतील नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, रात्रीच्या वेळी कंपन्यांकडून विषारी वायू सोडला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यामुळे खारघर आणि तळोजा परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
गावकऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, कंपन्यांचे सामान्य सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. त्यामुळे औद्योगिक कचरा सिडको डम्पिंग यार्डमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता साठवला जात आहे. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि पनवेल महापालिका यांना दोषी कंपन्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर तक्रारीमुळे प्रशासकीय यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रदूषणाची समस्या वेळीच सोडवली नाही तर नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world