सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांनी आणि प्रभाग 25 मधील इच्छुकांनी या प्रवेशाला जोरदार विरोध दर्शवला आहे. "कलाटे आले तर आम्ही वेगळा विचार करू", असा थेट इशाराच कार्यकर्त्यांनी दिल्यानं आता भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपच्या गोटात अस्वस्थता
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे राहुल कलाटे! तुतारी सोडून कलाटे कमळ हाती घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताने भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि इच्छुकांनी कलाटेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला असून, थेट वरिष्ठांनाच निर्वाणीचा इशारा दिला आहे.
(नक्की वाचा- BMC Election: बीएमसी निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन'! योगी आदित्यनाथ, पवन कल्याण यांच्यासह मोठी फौज सज्ज?)
संघर्ष केला, त्यांचाच प्रचार कसा करायचा?
विरोधकांचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय निष्ठा. राहुल कलाटे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यानंतर अश्विनी जगताप आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेत विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ज्यांच्या विरोधात कालपर्यंत संघर्ष केला, त्यांचाच प्रचार आता करायचा कसा? असा सवाल प्रभाग क्रमांक 25 मधील इच्छुकांनी उपस्थित केला आहे. जर कलाटेंना पक्षात घेतलं, तर आगामी महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांवर अन्याय होईल, अशी भीती या कार्यकर्त्यांना सतावत आहे.
एक-दोन दिवसात घेणार निर्णय
दुसरीकडे, आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचाही या प्रवेशाला विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, राहुल कलाटे स्वतः हा भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक असल्याचं समजतंय. आपण एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं असलं, तरी ते भाजपमध्ये जाणार की महायुतीच्या इतर मित्रपक्षात, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
(नक्की वाचा- Baramati Elections: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, समोर नोटांचा ढीग अन्... VIRAL व्हिडिओने बारामतीचे राजकारण तापलं)
आता चेंडू भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष पत्करून कलाटेंना पक्षात घेणार की कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखणार? कलाटेंचा प्रवेश लांबणीवर पडल्यानं पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका पाहायला मिळत आहे. राहुल कलाटेंच्या या संभाव्य 'एन्ट्री'मुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये उभी फूट पडणार की संवाद साधून हा वाद मिटवला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world