जाहिरात

NDTV Marathi Manch: 100 दिवसांचा कारभार, विरोधकांचे भविष्य ते नवे ध्येय.. CM फडणवीसांचे व्हिजन

NDTV Marathi Manch: अनेक विभागांनी दोन-दोन वर्षातील कामे शंभर दिवसात पूर्ण केली आहेत. कामकाजाचं जे टार्गेट दिलं होत, त्यात कुठलाच विभाग 50 टक्क्यांच्या खाली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

NDTV Marathi Manch: 100 दिवसांचा कारभार, विरोधकांचे भविष्य ते नवे ध्येय.. CM फडणवीसांचे व्हिजन
NDTV Marathi Manch Conclave

CM Fadnavis in NDTV Marathi Manch:  महायुती सरकारने पहिल्या 100 दिवसांत काय कामगिरी केली याचा लेखाजोखा राज्यातील जनतेला समजणार आहे. राज्यातील विविध विभागांनी पहिला १०० दिवसात काय काम केलं याचा आढावा सादर केला जाणार आहे. येत्या १५ मे रोजी महायुती सरकारच्या कारभाराचा निकाल लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ))

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटलं की, सरकारने सर्व विभागांना शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला होता. सरकार कसं पुढे जाणार आहे, याचा हा कार्यक्रम होता. प्रत्येक विभागाने टार्गेट यात ठरवायचे होते. यातील किती टार्गेट पूर्ण झालं याची तपासणी सध्या सुरु आहे. राज्यातील साडेबारा हजार ऑफिसेस जे थेट लोकांशी संबधित होते, त्यांनाही आम्ही ठराविक टार्गेट दिलं होतं. मागील शंभर दिवसात यातून प्रचंड काम झालं आहे.

अनेक विभागांनी दोन-दोन वर्षातील कामे शंभर दिवसात पूर्ण केली आहेत. कामकाजाचं जे टार्गेट दिलं होत, त्यात कुठलाच विभाग 50 टक्क्यांच्या खाली नाही. मला तर वाटतं ७५ टक्क्यांच्या खाली कुठलाच विभाग नसेल. येत्या १५ मे पर्यंत सर्व विभागांचा निकाल लागणार आहे. सर्व विभागांचे निकाल त्यांच्या वेबसाईटवर दिसतील. तुम्ही काय ठरवलं आणि काय काम पूर्ण केलं हे सर्व विभागांच्या वेब साईटवर पाहायला मिळेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा

इतर पक्षांना स्पेस ठेवणार नाही- फडणवीस

तीन पक्षांचं सरकार चालवत असताना आम्ही तिघे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवल्या तरी आमचा समन्वय चांगला आहे. एकमेकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. येत्या काळात आम्ही तिघे मिळून सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे पक्षांना चौथ्या, पाचव्या करता स्पेसच राहणार नाही. अनेक चांगले लोक पक्षात येत आहेत, त्यांना आम्ही घेत आहोत. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून त्यांच्या पक्षातील नेत्यांना फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत.  त्या पक्षांमध्ये त्यांना भविष्य दिसत नाही. या पक्षांमध्ये नेत्यांना नेतृत्व  दिसत नाही. त्यामुळे त्या पक्षातील नेते मुख्य प्रवाहात येण्यासाठी आमच्या पक्षात येत आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा- 'कोणासाठीही पॉलिटिकल स्पेस..', CM फडणवीसांच्या विधानाने विरोधकांची धाकधुक वाढणार!)

पुढच्या पाच वर्षात मुंबई बदलणार- फडणवीस

मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण करत आहोत. लवकरच पीएमओमध्ये प्रेझेंटेशन देखील करणार आहोत. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी काय अडचणी आहेत, त्या कशा दूर करता येतील. मुंबईत जमीन कमी आहे, इथे जागा उपलब्ध करुन देता येईल. येथील झोपडपट्ट्यांचं इथेच पुनर्वसन कसं होईल, याचा प्रयत्न आहे. पुढच्या पाच वर्षात दरवर्षी मुंबई सर्वांना बदलेली दिसेल. 

धारावीबाबत काही लोकांच्या डोक्यात अडचणी

धारावीबाबत सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत. काही नेत्यांच्या डोक्यात अडचणी आहे. काही नेत्यांनी जाणीवपूर्वक त्या तयार केल्या आहेत. त्यांच्या डोक्यातून काढणं अशी टेक्नोलॉजी अजून नाही. अशी टेक्नोलॉजी सापडली तरी त्याही दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र दुसरी काहीही अडचण नाही. 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही वाढीव मदत देऊ. राज्याची वित्तीय तूट सरकारने 3 टक्क्यांच्या खाली राखलीय. पुढील 2-3 वर्ष आम्ही हीच वित्तीय तूट राखली तर या योजना राबवणे अधिक सोपं होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यातील 60-70 टक्के शेतकरी आर्थिक तणावात असतात. राज्यातील शेतकऱ्यांना आपण वार्षिक 12 हजार रुपये मदत करतो. वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्सच्या माध्यमातून मदत करतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण शेतकऱ्यांना मदत करतच असतो. 

( नक्की वाचा : NDTV Marathi Manch Conclave : 'महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने पुढं जाणार'; NDTV मराठीच्या मंचावर नव्या मंत्र्यांनी सांगितलं पुढील 5 वर्षांचं व्हिजन  )

तर कर्जमाफीचा बँकानाच फायदा

चांगल्या मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांना होतो. दर पाच वर्षांनी एक वर्ष राज्यात दुष्काळ येतो. राज्य आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांना होईल. पुढील काळात जर दुर्दैवाने एखादं वर्ष दुष्काळी आलं तर त्यावेळी गरज असताना शेतकऱ्यांना आपल्याला कर्जमाफी देता येणार नाही, किंबहुना आपली क्षमता राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केवळ घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही

केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही. कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, योग्य परिस्थिती असेल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू. याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय असं नाही. त्याच्याआधीही आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही कर्जमाफी देणारच आहोत. मात्र केवळ घोषणा केली म्हणून बँकांचा फायदा करणे योग्य नाही. याउलट तेच पैसे शेती क्षेत्रात गुंतवले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा अधिक होईल, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: