
NDTV Marathi Manch Conclave : NDTV मराठी पहिल्या वर्धापनीदिनाच्या औचित्याने महाराष्ट्राच्या प्रगतीचा लेखाजोखा आणि भविष्यातील विकासाचा आराखडा राज्यासमोर मांडणारे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे याउद्देशानं 'मंच'ची उभारणी करण्यात आली. 'नवा गडी, नवं राज्य' या चर्चासत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर, समाज स्वास्थ कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर सहभागी झाले होते. NDTV मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी, विनोद तळेकर यांनी तिन्ही नव्या मंत्र्यांना बोलतं केलं.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना टार्गेट दिलं होतं. त्यामुळे पहिल्या 100 दिवसात त्यांनी काय काय काम केलं आणि पुढील पाच वर्षांचं त्यांचं व्हिजन काय असेल याचा आलेख मांडला. यावेळी तिन्ही नव्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं. त्यांनी दिलेल्या टार्गेटनुसार काम सुरू असून येत्या पाच वर्षात महाराष्ट्र वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेघना बोर्डिकरांनी सांगितलं पुढील 5 वर्षांचं स्वप्न...
महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात राज्य मागे पडताना दिसत आहे. लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकार स्वत:च्या चालीत अडकल्याचं दिसतंय अशी चर्चा आहे. या प्रश्नावर मेघना बोर्डिकर म्हणाले,
सरकार गोंधळलेलं नाही. राज्यात पहिल्यांदा लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली. ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात या 1500 रुपयांनी मोठी फरक पडला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी गोंधळ निर्माण केला आहे. पीएम किसान किंवा नमो किसान योजनेमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे रोखले जाणार नाही. लाडकी बहीण योजनेत कोणत्याही अडचणी आल्या तरीही मुख्यमंत्री फडणवीस त्यातून मार्ग काढतील. दुसरं म्हणजे 2100 रुपयांबद्दल सांगायचं झाल्यास, योग्य वेळ आली की महिलांना वाढवलेला हफ्ताही मिळणार. येत्या पाच वर्षात पाणीपुरवठा, स्वच्छता यामध्ये सुधारणा करण्याचं ध्येय आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून क्रेडिट सोसायटी तयार करून महिलांना आर्थिक निर्भय करणं हे माझं स्वप्न आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठी सौर वितरण प्रणाली उभारली जात आहे. यातून 16000 मेगावॅट सौर उर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. ही वीज सरकारी कार्यालयातही वापरता येऊ शकते.
नक्की वाचा - NDTV Marathi Manch Conclave : एकनाथ शिंदे नाराज असले की दरेगावला जातात? शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?
प्रकाश आबिटकर म्हणाले, 108 ही जगभरातील सर्वोत्कृष्ट सेवा ठरेल
100 दिवसात अडीच कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात ज्या महिला दवाखान्यातच जात नव्हत्या, त्या महिलांची तपासणी झाली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय बॉम्बे नर्सिग अॅक्ट ऑनलाइन करण्यात आला. रक्त तपासणी आणि इतर महत्त्वाच्या तपासणी केल्या जाणाऱ्या लॅबचं मॉनिटरींग केलं जात आहे. लवकरच लॅबसंदर्भात एक कायदा आणला जाणार असून पुढील अधिवेशनात याचा ड्राफ्ट सादर केला जाणार आहे. पीसीपीएनडीटी अॅक्टमधील काही मर्यादा लक्षात घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. 108 क्रमांक सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू असून येत्या काळात महाराष्ट्रातील ही सेवा देशातील सर्वोत्कृष्ट सेवा म्हणून ओळखली जाईल.
बाळ पोटात असताना आईची आणि पोटातील बाळाची काळजी घेणारं हे सरकार आहे. या सर्वांसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो. राजकीय नेतृत्वाने टार्गेट ठेवून लोकाभिमुख काम केलं तर मोठा बदल होऊ शकतो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील एखाद्या विषयावरुन राज्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम नाही, असे म्हणणं चुकीचे होईल. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने पुढं जाणार.
खड्डेमुक्त रस्ता हा संकल्प राबवला गेलाच पाहिले, शिवेंद्रराजे भोसलेंचा काय आहे प्लान?
इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं हे नितीन गडकरींनी दाखवून दिलं आहे. खड्डेमुक्त रस्ता हा संकल्प राबवला गेलाच पाहिले. यासाठी प्रयत्न सुरू आहे. खड्डे तक्रारीसंदर्भात अॅप्स आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. इतक्या बारकाईने काम केलं जात आहे. या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. खड्डे भरतानाही तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी विचार करायला हवा. खड्डेमुक्त रस्ता ही संकल्पना राबवली गेलीच पाहिजे आणि ते राबवायचं काम चाललंय. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी अॅप्स सुद्धा आहेत, इतक्या बारकाईने काम सुरू आहे.
बीओटी हा एकमेव पर्याय असं मी म्हणत नाही. मात्र एक मार्ग आहे. थकीत देणी ०३-०४ मधली आहे. इतर ठिकाणी मोठी काम सुरू आहेत. काही प्रकल्प बीओटीवर घेतले आहेत. तुम्ही योग्य वेळेत योग्य दर्जेत रस्ता, पूल बांधला तर लोक टोल द्यायलाही तयार असतात. मेन्टेनन्स व्यवस्थित हवा. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. त्यामुळे नागरिक आवर्जून पूल, रस्त्याचा वापर करतात. आणि लोक टोल द्यायला तयार होतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world