देविदास राखुंडे, पुणे
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेज प्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवलाय. त्यामुळे अजित पवार गटात पक्षांतर्गत दुफळी माजली आहे. पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गारटकरांनी दिला आहे.
जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
(नक्की वाचा- Dombivli News : डोंबिवलीत राजकीय भूकंप! मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाची ED कडून चौकशी; नेमके काय घडले?)
जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळासोबत आहोत.
पक्षाने जर आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world