अविनाश पवार
सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे सोमवारी दुपारी भरदिवसा झालेल्या निर्घृण खुनाने शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये 22 वर्षीय तौकीर शेख याची कोयत्याने सपासप वार करून आणि नंतर मोठ्या दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तो धनकवडीचा राहाणारा होता. या थरकाप उडवणाऱ्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तौकीर शेख ‘कृष्णकुंज' इमारतीच्या पार्किंगमध्ये एकटाच बसला होता. त्यावेळी पाच जणांचा गट अचानक तेथे दाखल झाला. कोणत्याही वादाविना त्यांनी तौकीरवर कोयत्यांनी हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तौकीरवर हल्लेखोरांनी मोठा दगड टाकून वारंवार प्रहार करत त्याचा जागीच खून केला. त्यानंतर आरोपी क्षणात तेथून फरार झाले.
घटनेनंतर सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने पंचनामा करून तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हल्लेखोरांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध किंवा जुन्या वादातून हा हल्ला झाला का? याची चौकशी सुरु आहे. आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, वापरलेली शस्त्रे आणि मोटारसायकलींची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, तौकीर शेख याच्यावर यापूर्वी काही गुन्हे नोंद होते. त्याचे कोणत्या टोळीशी संबंध होते का, हेही तपासले जात आहे. हा “नियोजित आणि अतिशय क्रूर” हल्ला असून आरोपी लवकरच अटक होतील असं पोलीसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांत पुण्यात गंभीर गुन्ह्यांची मालिका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः सिंहगड रोड, कात्रज, हडपसर, येरवडा, वारजे आणि कोथरूड परिसरात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याची पोलिस नोंदींमध्ये नोंद आहे. स्थानिक वर्चस्वासाठीचे वाद, नशेचे व्यसन आणि टोळक्यांतील संघर्षामुळे तरुणांमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. दुपारी भरदिवसा घडलेल्या या खुनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world