
आपली जबाबदारी सक्षमपणे न पाळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना निलंबनानंतर पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती देणे हे त्यांच्या दोषावर पांघरून घालण्यासारखे आहे. अशा गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश स्वारगेट बसस्थानकाला अचानक दिलेल्या भेटीप्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले आहेत.
फेब्रुवारीमध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. स्वारगेट बसस्थानकावरील वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले असं सरनाईक यावेळी म्हणाले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.
नक्की वाचा - Nana Patekar: नाना पाटेकरांची पुण्यात मोठी घोषणा, म्हणाले आता या पुढे सिनेमा नाटक...
तत्पूर्वी खात्यांतर्गत विभागीय चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी त्यांची बदली अन्यत्र करणे गरजेचे होते. असे असताना प्रादेशिक व्यवस्थापक यांनी त्यांच्या बदल्या अन्यत्र न करता तेथेच त्यांची नियुक्ती केली. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला. तसेच विधिमंडळात मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची घोर फसवणूक झाल्याचे देखील स्पष्ट दिसून येते. त्यामुळे संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
शिवाय निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावरच नियुक्ती दिलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहे, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकावरील प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह चालक-वाहक विश्रांती गृह यांची पाहणी केली. प्रवासी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी व सूचना ऐकून त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सरनाईक यांनी निर्देश दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world