ठाण्याच्या नेत्या अनिता बिर्जे यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या सोहळ्यात बिर्जेंचं पक्षात स्वागत करण्यात आलं. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
अनिता बिर्जे यांनी शिवसेनेला तळगाळात पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेंनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.. 'शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात सौ.अनिता ताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल.'
उबाठा गटाच्या उपनेत्या आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक सौ.अनिता ताई बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी… pic.twitter.com/J2DIpJanoT
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 10, 2024
शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अनिता बिर्जे या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख होत्या. मात्र, आता त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असून वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world