Nashik News: "कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा" पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने चर्चेत आला आहे. सिडको परिसरातील गजबजलेल्या दत्त चौकात काल रात्री शिंदे सेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, सुयश पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्रीची थरारक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, सुयश पाटील हे आपल्या कार्यालयाजवळ असताना अचानक आलेल्या एका अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी हातात धारदार कोयते घेऊन पाटील यांच्यावर सपासप वार केले. सुयश पाटील यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि तिथून पोबारा केला. पाटील यांना तातडीने नाशिकमधील एका खाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Solapur News: टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीची हाव, गरीबाच्या लेकीचा झळ, अन् 4 महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट)
सीसीटीव्हीत कैद झाले हल्लेखोर
हल्ल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये तीन संशयित हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या पथकांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सिडको परिसरात शिंदे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंबड पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world