जाहिरात

पिंपरी महापालिकेत दोन प्रभागांतील 4 जागांच्या आरक्षणात अचानक बदल! निवडणूक आयोगाने दिले 'हे' कारण...

नियमानुसार, ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) किंवा दोन्हीकरिता राखीव असतील, परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरीता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी तरतूद आहे.

पिंपरी महापालिकेत दोन प्रभागांतील 4 जागांच्या आरक्षणात अचानक बदल! निवडणूक आयोगाने दिले 'हे' कारण...

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागांतील चार जागांच्या आरक्षणात दुरुस्ती केली आहे. या बदलामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण महिला आरक्षणावर थेट परिणाम झाला आहे.

नेमका बदल काय झाला?

निवडणूक आयोगाने केलेल्या दुरुस्तीनंतर प्रामुख्याने प्रभाग क्र. 19 आणि प्रभाग क्र. 30 मधील आरक्षणात फेरबदल झाले आहेत.

प्रभाग क्र. 30 : येथे ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली 'क' जागा आता ओबीसी महिलांसाठी राखीव झाली आहे.

प्रभाग क्र. 30 : या प्रभागातील 'ड' जागा जी पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती, ती आता फक्त सर्वसाधारण झाली आहे.

प्रभाग क्र. 19 : ओबीसी जागेवर महिला आरक्षण झाले असल्याने, पूर्वी सोडतीत 'ब' जागा जी ओबीसी महिलांसाठी राखीव झाली होती, त्यावरील महिला आरक्षण रद्द झाले आहे आणि ती आता फक्त ओबीसी प्रवर्गासाठी असेल.

प्रभाग क्र. 19: प्रभाग 30 मधील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रभाग क्र. 19 मधील 'क' जागा आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

(नक्की वाचा-  Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

बदलाचे कारण काय ?

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडती पार पडली होती. या सोडतीनंतर अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितावर परिणाम झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर झालेल्या दुरुस्तीमुळे आता राजकीय चित्र पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत.

चूक दुरुस्तीचे कारण

नियमानुसार, ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) किंवा दोन्हीकरिता राखीव असतील, परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरीता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी तरतूद आहे.

प्रभाग क्र. 30 मध्ये ही नियमातील तरतूद वापरली गेली नव्हती. हीच चूक आयोगाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे ओबीसी महिला आरक्षणाचा फेरबदल झाला.

निवडणूक आयोगाची भूमिका काय ?

पिंपरी चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी याबाबत माहिती दिली की, आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने सोडतीत झालेली चूक दुरुस्त केली आहे. नियमानुसार योग्य पद्धतीने निश्चित झालेले आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(नक्की वाचा- Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; विधवा महिलांबद्दल म्हणाले...)

काय असणार बदलानंतर आरक्षणाचे अंतिम चित्र (दुरुस्तीसह)

प्रभाग क्रमांक - 19 उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प

अ - अनुसूचित जाती - महिला
ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क - सर्वसाधारण (महिला)
ड - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक - 30 दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी

अ - अनुसूचित जाती
ब -अनुसूचित जमाती - महिला
क - नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला
ड - सर्वसाधारण

नागरिकांना हरकत नोंदवण्याची मिळणार संधी

दोन प्रभागांतील चार जागांवर झालेला हा बदल अनेक इच्छुकांसाठी अत्यंत परिणामकारक ठरणार आहे. परंतु, ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आलेला असल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. मात्र निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणालाही कोणतीही हरकत असल्यास, ती नागरिकांना 17 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक विभागाकडे नोंदविता देखील येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com