त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Today Dangerous Accident News : किनगाव-अहमदपूर महामार्गावर आज गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. काजळ हिप्परगा परिसरातील 'डुक्कर बंदा' येथे एका धावत्या कारने भीषण पेट घेतला. अपघात इतका भयंकर होता की, अहमदपूर येथील शिक्षक तथा प्रसिद्ध किर्तनकार माधव श्रीवाड यांचा कारमध्येच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वीच श्रीवाड एका कार अपघातातून बचावले होते. पण आज त्याच महामार्गावर काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार,माधव श्रीवाड हे त्यांच्या कारने किनगावकडून अहमदपूरच्या दिशेने येत होते.सकाळी साडेअकराच्या सुमारास काजळ हिप्परगा शिवारात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला जोरात धडकली. त्यानंतर काही क्षणातच या कारने पेट घेतला. त्याचदरम्यान गाडीत असणाऱ्या श्रीवाड यांना दरवाजा उघडण्याची संधीच मिळाली नाही. कारने पेट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.हे विदारक दृश्य पाहून रस्त्यावरील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही जवळ जाता आले नाही.
पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीनं घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक विनोद पवार, तयब शेख, राम रामोळे, प्रकाश भोपळे घटनास्थळी दाखल झाले. तसेच अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक प्रभारी अधिकारी कैलास सोनकांबळे, ड्रायव्हर अजितकुमार लाळे, फायरमॅन प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे श्रीवाड कारमध्येच होरपळले.पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
नक्की वाचा >> BMC Exit Poll : मुंबईतील मराठ्यांनी कोणाला दिलं मत? महिला-पुरुषांची टक्केवारी किती? पाहा पक्षनिहाय आकडेवारी
अहमदपूर परिसरात शोककळा
माधव श्रीवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपदेव हिप्परगा (ता.अहमदपूर) येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच अहमदपूर शहरातील टेंभुर्णी रोडवर त्यांचे पवन किराणा स्टोअर्स होते.एक मनमिळावू शिक्षक आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Pune News: निवडणूक आयोगाचा अंधाधुंद कारभार? ब्रेलमध्ये माहिती उपलब्ध नाही, 'या'मतदारांनी आता काय करावे?
एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरपला!
सह शिक्षक माधव श्रीवाड हे केवळ एक आदर्श शिक्षकच नव्हते, तर ते एक उत्तम कीर्तनकार सुद्धा होते.ह.भ.प.माधव महाराज श्रीवाड गुरुजी म्हणून ते वारकरी संप्रदायात आणि परिसरात सुप्रसिद्ध होते.आपल्या सुश्राव्य वाणीने ते अतिशय सुंदर कीर्तन करायचे. त्यांची अनेक कीर्तने सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे 'आई' नावाचे स्वतःचे युट्युब चॅनेल असून त्या माध्यमातून ते आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत असत.त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world