BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात दादरमधील प्रभाग क्रमांक 192 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यशवंत किल्लेदार (MNS Yashwant Killedar) यांनी विजय मिळवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' आणि शिवसेना भवनाचा या प्रभागात समावेश होतो. मराठी अस्मितेच्या मुद्दावर निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये 6 जागांवर यश मिळाले. या विजयानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन आनंद साजरा केला होता.
नक्की वाचा: BMC Election 2026 Result: मुंबईत महापौर कोणाचा होणार? एका रात्रीत चित्र पालटले
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा किल्लेदारांना फायदा
विजयी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना यशवंत किल्लेदार यांनी म्हटले की, "या निवडणुकीत ठाकरे बंधू (राज आणि उद्धव ठाकरे) एकत्र आल्यामुळे मला विजयासाठी मोठी मदत झाली." किल्लेदार यांच्या विजयानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही किल्लेदारांना फोन करून शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंनी फोनवर बोलताना म्हटले की, "शिवसेना भवन हे माझे हृदय आहे आणि ते याच प्रभागात येते, त्यामुळे त्याची नीट काळजी घे."
ठाणे महानगरपालिकेत मनसे आणि काँग्रेसचा धुव्वा
मुंबईत यश मिळाले असले तरी, ठाणे महानगरपालिकेत मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात संयुक्त सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी गंभीर आरोप केला होता की, "आमच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी विरोधकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या जात आहेत." राज आणि उद्धव ठाकरे यांच्या निवडक संयुक्त सभा झाल्या होत्या, त्यातील एक ठाण्यामध्ये होऊनही मनसेला त्याचा काहीही फायदा झाला नाही.
मुंबईनंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला यश
मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले असून संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेले हे सगळ्यात मोठे यश आहे. मुंबई पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. नवी मुंबईमध्येही मनसेचा एक नगरसेवक जिंकून आला आहे. या तीन महापालिका सोडल्या तर उरलेल्या 26 महानगरपालिकांमध्ये मनसेला कुठेही यश मिळालेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world