रिझवान शेख
Raj And Uddhav Thackeray Joint Rally In Thane: ठाणे जिल्हा हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाणे महानगरपालिका ही या बालेकिल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. या बुरुजाला सुरूंग लागावे यासाठी ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे यांचे विरोधक शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही याच उद्देशाने ठाण्यामध्ये येणार असून या दोघांची तिसरी जाहीर आणि संयुक्त सभा ठाण्यात होणार आहे.
नक्की वाचा: Badlapur News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केलं स्वीकृत नगरसेवक; स्थानिकांचा संताप
ठाकरे बंधूंची ठाण्यात सभा कुठे होणार ?
शिवसेना आणि मनसेने 12 जानेवारीला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. "मुक्काम पोस्ट ठाणे, मराठी जनांना आग्रहाचे निमंत्रण" असं सभेसाठीच्या निमंत्रणावर लिहिण्यात आले आहे. या निमंत्रणावर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला असून दोन्ही सेनांची चिन्हे आहेत. संध्याकाळी 5 वाजता गडकरी रंगायतनसमोर ही सभा होणार आहे.
नक्की वाचा: 'MIM सोबत युती केली तेव्हा कुठे गेलं होतं हिंदूत्व', उद्धव यांनी भाजपला घेरलं, पहिल्याच सभेत धारेवर धरलं
5-7 दिवसांत काय तीर मारणार! विश्लेषकांचा सवाल
ठाण्याला ठाकरे बंधूंनी वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे, असं विश्लेषण लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी केलं. NDTV मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "मनसेला एक पोकळी भरून काढण्याची चांगली संधी होती. निवडणुका एक दीड वर्षावर येऊन ठेपल्या होत्या हे त्यांना माहिती होतं. विधानसभा निवडणुका जमणार नव्हत्या, नगरपालिका निवडणुकांशी काही देणंघेणं नव्हतं, पण महापालिका निवडणुकांवर लक्ष का केंद्रीत केलं नाही? 5-7 दिवसांत काय तीर मारणार आहात? किती सभा घेणार आहात? दिवसाला 3 सभा? राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणुका होत असताना सगळं लक्ष हे मुंबईवरच आहे. ठाण्यालाही वाळीत टाकलंय."
ठाण्यात शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध
ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 जागा आहेत. यापैकी 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्याने किंवा अर्ज बाद झाल्याने शिवसेनेचे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यामध्ये शिवसेनेने 87 जागांवर तर भाजपने 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.