Palghar Politics: ठाणे-पालघर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी फायनल होणार असताना, दुसरीकडे नेत्यांच्या गुप्त भेटीगाठी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली आहे. या निवडणुकीत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून, शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक थेट बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) नेत्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
विरारमध्ये ठाकूर पिता-पुत्रांची घेतली भेट
शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रवींद्र फाटक यांनी एकप्रकारे आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
पाठिंबा मिळवण्यासाठी रवींद्र फाटक हे महायुती आणि मित्रपक्षांच्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात जाऊन पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
बविआकडे 71 नगरसेवकांचे बळ
वसई-विरार महापालिका आणि पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे मोठे वर्चस्व आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरसेवकांची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मते मिळावीत यासाठी महायुतीने ही 'भेटीगाठी रणनीती' सुरू केली आहे. जर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर शिवसेनेचे पारडे अत्यंत जड होणार असून त्याचा मोठा फायदा महायुतीला मिळेल.
(नक्की वाचा- Virat vs Head: कोहलीसोबतच्या वादानंतर हेडच्या पत्नीसोबत नको ते घडलं; जेसिका हेडने व्यक्त केली नाराजी)
चर्चा सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती
रवींद्र फाटक आणि ठाकूर पिता-पुत्रांमध्ये विरार येथील बैठकीत आगामी निवडणुकीच्या पाठिंब्याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळवण्यात महायुतीला यश आले, तर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीसाठी अत्यंत सोपी होईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world