मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंघण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे गटाच्या रिद्धी खुरसुंगे यांच्यासह त्यांचे पती भास्कर खुरसुंगे आणि गीता सिंघण यांचे पती संजय सिंघण यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. यातील रिद्धी खुरसुंगे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य म्हणून काम केले होते. तर गीता सिंघण यांनी मुंबई महानगरपालिकेत महिला आणि बालकल्याण समिती तसेच बाजार आणि उद्यान समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अथक काम करण्याची पद्धत पाहून प्रेरित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे या दोघींनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - मुंबईत ठाकरे गटाचा धक्का, 4 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
शिवसेनेत प्रवेश करताच ताबडतोब कामाला लागा, महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना यासारख्या योजनांचे फॉर्म ताबडतोब भरून घ्या आणि आपल्या विभागातील जास्तीत जास्त लोकाना या योजनांचे लाभ कसे मिळू शकतील ते पहा, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world