
प्रांजल कुलकर्णी, नाशिक
Nashik News : राज्यातील अनेक भागांना मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या खरीप आढावा बैठक होत आहेत. खरीप पेरणीला सामोरे जात असताना काही अडचण आहेत का याबाबत आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्यात 26 ते 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान अमरावतीमध्ये झालं आहे. तात्काळ पंचनामे करून सरकारला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
(नक्की वाचा- Rain Forecast : राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुण्यासह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट)
पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. यावर बोलताना कृषिमंत्र्यांनी म्हटलं की, शेतीचं नुकसान लगेच लक्षात येत नाही. दोन दिवस झाल्यानंतर लक्षात येईल. नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत उशीरा मिळते, हे खरं आहे. मात्र लवकर मदत मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असा शब्दही माणिकराव कोकाटे यांनी दिला.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)
कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं
खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अनेक अधिकारी उपस्थित नसल्याने संतापल्याचं पाहायला मिळालं. लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता बैठकीला अनुपस्थित होते. गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा तसेच मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देखील माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. सोलरच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटे यांनी धारेवर धरले. मागेल त्याला शेततळे देतात मग सोलर का देत नाही ? असा प्रश्न विचारत कोकाटे संतप्त झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world