मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाने वसई आणि विरार परिसरातील जमीन माफियांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना दणका देताना, पोलिसांनी कुख्यात भूमाफिया सुरेंद्र अलगू सिंग उर्फ रंधा याच्यावर एका महिन्यात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. रंधा सध्या पोलीस कोठडीत असून, त्याचा भाऊ अरविंद सिंग उर्फ दारा अद्याप फरार आहे.
फसवणुकीचा नवा गुन्हा
इस्टेट एजंट राज जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रंधा आणि त्याच्या साथीदारांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 27 लाख रुपये घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर सदनिका आणि गाळ्यांची विक्री केल्याचा आरोप आहे. अनधिकृत बांधकाम, सरकारी जागेवर कब्जा करणे, रस्ता अडवणे आणि तक्रारदारांना धमकावणे अशा विविध कलमान्वये रंधा आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
पर्यावरणाची हानी, 19 जणांवर गुन्हे
केवळ जमिनी बळकावणेच नव्हे, तर पर्यावरणाचा नाश करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाळीव परिसरात समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित मॅन्ग्रोव्हजवर (कांदळवन) बेकायदेशीर माती भराव टाकणाऱ्या 19 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर 18 जणांचा शोध सुरू आहे. संघटित गुन्हेगारीच्या (BNS 111) नवीन कायद्यानुसार ही कठोर कारवाई केली जात आहे.
(नक्की वाचा- Pune News: लग्नासाठी बनला 'पोलीस', फ्लेक्स लावत केली चमकोगिरी अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला)
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वसई-विरार परिसरात घरांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन अनेक भूमाफिया सक्रिय झाले आहेत. "नागरिकांनी कोणत्याही मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीची कागदपत्रे, रेरा (RERA) नोंदणी आणि पालिकेची परवानगी यांची कसून तपासणी करावी. स्वस्त घरांच्या आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेऊ नका," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world