अमजद खान, कल्याण
वयोवृद्ध प्रवाशाला धावत्या ट्रेनमध्ये काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आधी जागेवरून तरुण आणि वयोवृद्ध प्रवाशामध्ये वाद झाला. या वादादरम्यान तरुणांना माहिती पडले की, वयोवृद्ध व्यक्तीजवळ बीफ आहे. त्यावरुन पाच ते सहा तरुणांनी कल्याण ते ठाणे दरम्यान वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. हाजी अशरफ अली असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाणे जीआरपी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी धुळे क्राईम ब्रांच पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, काही तरुण एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत भांडण करत आहेत. संबंधित वयोवृद्धाच्या हातात दोन बरण्या होत्या. त्या बरण्यांमध्ये बीफ आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. संबंधित या व्यक्तीचा शोध घेतला. ठाणे जीआरपी आणि कल्याण जीआरपी पोलिसानी भिवंडी कोनगाव राहणाऱ्या हाजी अशरफ अली यांची चौकशी केली.
(नक्की वाचा : मुस्लिमांना लग्न-घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य)
हाजी अशरफ 28 ऑगस्ट रोजी धुळे-मुंबई एक्सप्रेसमध्ये चाळीसगावहून कल्याणच्या दिशेने निघाले होते. इगतपूरी स्टेशन गेल्यावर एका तरुणासोबत अशरफ अली यांचा जागेवर बसण्यावरुन वाद झाला. वाद सुरु असताना कल्याण स्टेशनजवळ आली. अशरफ अली यांनी त्यांच्या हातातील साहित्य उचलून उतरण्याची तयारी सुरु केली. त्यांच्या हातात दोन बरण्या होत्या. त्या बरण्यांमध्ये बीफ होते. अशरफ अली हे बीफ घेऊन प्रवास करत आहेत हे पाहताच आधीच चिडलेल्या तरुणांनी अशरफ अली यांना मारहाण सुरु केली. मारहाण करुन त्यांना कल्याण स्टेशनला उतरू देखील दिले नाही. त्यांना ठाण्यापर्यंत नेले.
(नक्की वाचा- IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)
कसेबसे अशरफ अली ठाणे स्टेशनला उतरले. या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे की, ठाणे जीआरपीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे क्राईम ब्रांच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. अशरफ अली यांनी त्यांच्याजवळील बीफ असल्याचे पोलिसांकडे मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर या घटनेनंतर अशरफ अली यांच्याविषयी एक अफवा पसरली. त्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र अशरफ अली यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात त्यांनी मी जिवंत असल्याने सांगितले आहे. तसेच कोणीही माझ्याबद्दल अफवा पसरवू नका. माझ्यासोबत घडलेल्या घटनेविषयी कोणी भडकू नका आणि काही करु नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world