जाहिरात

Vasai Crime News : वसईतून तब्बल 8 कोटींचे हेरॉईन जप्त, 3 आरोपींना अटक

Vasai Crime News : समुंदरसिंग देवडा (वय 49), युवराजसिंग राठोड (वय 28), आणि तकतसिंग राजपूत (वय 38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही राजस्थानमधील जोधपूर आणि सिरोही येथील रहिवासी आहेत.

Vasai Crime News : वसईतून तब्बल 8 कोटींचे हेरॉईन जप्त, 3 आरोपींना अटक

मनोज सातवी, वसई-विरार

विरार क्राईम ब्रँच युनिट 3 ने धडाकेबाज कारवाई करत वसई येथून तब्बल 8 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थानमधील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, वालीव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुंदरसिंग देवडा (वय 49), युवराजसिंग राठोड (वय 28), आणि तकतसिंग राजपूत (वय 38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही राजस्थानमधील जोधपूर आणि सिरोही येथील रहिवासी आहेत. आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

(नक्की वाचा-  Akola News : 1 लाख देतो, आजारही बरा करतो; धर्मांतरासाठी दिलं आमिष, अकोल्यातील धक्कादायक प्रकार)

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, वसई पूर्वेच्या फादरवाडी परिसरात काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फादरवाडी-रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 11 ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि 5 लाख 65 हजार रुपये किमतीची एक चारचाकी गाडी असा एकूण 8 कोटी 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

(नक्की वाचा-  Akola News: अकोल्यात औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; 8 ते 10 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल)

आरोपींविरोधात वालीव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही यशस्वी कारवाई विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com