
मनोज सातवी, विरार
सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप उपजिल्हाध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 22 वर्षीय तरुणीवर कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.
गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं भाजप वसई-विरार उपजिल्हाध्याचं नाव आहे. तसेच तो उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी आहे. त्याच्यासोबत नवीन सिंग आणि त्याची पत्नी अशा तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर पीडित महिलेला कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचे औषध मिसळत महिलेला बेशुद्ध करून सामूहिक बलात्कार केल्याचा, तसेच तिचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत सतत बलात्कार केल्याचा आरोपासह इतर आरोप करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- 'असा न्याय अपेक्षित नव्हता', अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर पीडित चिमुरडीचे वकील असं का म्हणाले?)
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 साली आरोपी गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव याने पीडित महिलेला कामाचे पैसे देतो असे सांगून होळीच्या दिवशी त्याच्या एका इमारतीमध्ये बोलावून घेतले. तिथे तिला कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर संजू श्रीवास्तव आणि नवीन सिंग यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे त्यावेळी नवीन सिंग याची पत्नी हिने या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ तयार केला.
नवीन सिंग याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेशी जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून तिला गरोदर केल्याचा आरोप आहे. तसेच तक्रार करु नये म्हणून फिर्यादी यांचेशी लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीसोबत वांरवार शरीरसंबंध ठेऊन तिला दोन वेळा तिचा गर्भपात केल्याच्या आरोप पीडितेने केला आहे.
(नक्की वाचा - सून चार महिन्यांची गर्भवती, सासुचं धक्कादायक पाऊल; तरुणीच्या मृत्यूने इंदापूर हादरलं!)
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसर, आरोपी नवीन सिंग याचेपासून 29 एप्रिल 2024 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. आता पुन्हा ती एक महिन्याची गरोदर आहे. नवीन सिंग आता पीडिता आणि तिच्या मुलीचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करत आहे. शिवाय नवीन सिंग याची पत्नी सतत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.
याप्रकरणी आरोपी संजू श्रीवास्तव, नवीन सिंग आणि नवीन सिंग याची पत्नी या तिन्ही आरोपी विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world