जाहिरात

Pune Crime News: पुण्यात 24 वर्षीय तरुणाची हत्या, ममता बॅनर्जी भडकल्या; नेमकं काय घडलं?

Pune Crime News: सुखेनच्या कुटुंबाने असा आरोप केला आहे की,  सुखेनला मराठी येत नव्हती. तो बंगालीत बोलत असल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी त्याच्याशी वाद घालून त्याची हत्या केली.

Pune Crime News: पुण्यात 24 वर्षीय तरुणाची हत्या, ममता बॅनर्जी भडकल्या; नेमकं काय घडलं?

Pune Crime News: पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेला 24 वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेन महातो याची पुणे जिल्ह्यातील कोरेगाव (शिक्रापूर) येथे हत्या झाली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, "केवळ भाषा आणि प्रादेशिक ओळखीमुळे सुखेनची हत्या करण्यात आली," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांचे ट्वीट

ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, "सुखेन महातो हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता आधार होता. भाषेमुळे आणि प्रादेशिक ओळखीमुळे त्याला लक्ष्य करून त्याचा छळ करण्यात आला. ही घटना म्हणजे देशात पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाचे थेट फळ आहे." या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

कुटुंबाचा आणि 'कुर्मी' संघटनांचा आरोप

सुखेन हा एका कार पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीत काम करत होता. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केला आहे की,  सुखेनला मराठी येत नव्हती. तो बंगालीत बोलत असल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी त्याच्याशी वाद घालून त्याची हत्या केली. पीडित कुटुंब कुर्मी समाजातील असून, त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्यास नकार दिला आहे. "आमचा मुलगा उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा बळी ठरला आहे," असे सुखेनच्या वडिलांनी म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, पुणे पोलिसांनी 'हेट क्राईम'चा आरोप फेटाळून लावला आहे.  पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याबाबत म्हटलं की,  भीमा कोरेगाव येथे 10 फेब्रुवारी रोजी एक मृतदेह सापडला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार, सुकेन महातो असे मयताचे नाव आहे, तो मुळाचा पश्चिम बंगलाचा आहे. मयत भीमा कोरेगाव येथे राहत होता आणि एका कंपनीत काम करत होता. 

(नक्की वाचा-  Ajit Pawar Death: पटेल, तटकरे, अरोरा... रोहित पवार नाव न घेता स्पष्टच बोलले, नव्या दाव्यांनी खळबळ)

पोलीस अधीक्षक गिल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, दोन तरुणांसोबत अचानक त्याचं काही कारणावरून भांडण झालं होतं.  त्यानंतर झालेल्या बाचाबाचीतून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दोन संशयीतीना ताब्यात घेण्यास आमची टीम गेली आहे. विशिष्ट गोष्टीवरून लक्ष्य करून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा आमच्या तपासात अजूनतरी समोर आलेलं नाही, असं देखील संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com