सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज येथे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत खेळतो आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आहे. अशातच BCCI ने भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या दौऱ्यासाठी सर्व सिनीअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून शुबमन गिलच्या नेतृत्वात तरुण भारतीय संघ बीसीसीआयने मैदानात उतरवला आहे. शुबमन गिलकडे भारतीय संघाची महत्वाची जबाबदारी देऊन बीसीसीआयने आगामी काळात त्याचा कर्णधारपदासाठी विचार केला जाऊ शकतो हे सूचवलं आहे.
याव्यतिरीक्त चार नवोदीत खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएलचा हंगाम गाजवणारे अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, रियान पराग यांना संघात स्थान मिळालं आहे. याचसोबत मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेलाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे. याचसोबत डावखुरा गोलंदाज खलिल अहमदनेही भारतीय संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन केलं आहे.
असा असेल भारतीय संघ -
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे
असं असेल मालिकेचं वेळापत्रक -
१) पहिली टी-२० : ६ जुलै
२) दुसरी टी-२० : ७ जुलै
३) तिसरी टी-२० : १० जुलै
४) चौथी टी-२० : १३ जुलै
५) पाचवी टी-२० : १४ जुलै
हे सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरु होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world