SMAT : मध्य प्रदेशवर मात करत मुंबईने दुसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

नाबाद 36 धावा आणि 1 विकेट घेतलेला सूर्यांश सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत 469 रन्स केलेला अजिंक्य रहाणे मालिकावीर ठरला.

जाहिरात
Read Time: 3 mins
विजयानंतर जल्लोष करताना मुंबईचा संघ (फोटो सौजन्य - PTI)
बंगळुरु:

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने मध्य प्रदेशवर 5 विकेट राखून मात केली. विजयासाठी मिळालेलं 175 धावांचं आव्हान मुंबईकडून सूर्यकुमार यादव, सूर्यांश शेडगे आणि अजिंक्य रहाणे यांनी फटकेबाजी करत पूर्ण केलं. नाबाद 36 धावा आणि 1 विकेट घेतलेला सूर्यांश सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत 469 रन्स केलेला अजिंक्य रहाणे मालिकावीर ठरला.

नाणेफेक जिंकून मुंबईचा पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय -

श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या बॉलर्सनी त्याचा हा निर्णय सार्थही ठरवला. दुसऱ्याच षटकात शार्दुल ठाकूरने अर्पित गौड आणि हर्ष गवळी यांना माघारी धाडलं. यानंतर सुभ्रांशू सेनापती आणि हरप्रीत सिंग यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. ही जोडी मैदानावर टिकतेय असं वाटत असतानाच अथर्व अंकोलेकरने हरप्रीत सिंगला माघारी धाडलं. या धक्क्यातून मध्य प्रदेश सावरतोय न सावरतोय तोच शिवम दुबेने सेनापतीचा अडसर दूर केला.

कर्णधार पाटीदारची निर्णयाक खेळी - 

संघाला गळती लागलेली असताना मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने साजेशी खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत रजतने चिन्नास्वामी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याला वेंकटेश अय्यर आणि राहुल बाथम यांनी महत्वाची साथ दिली. रजत पाटीदारने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून 40 बॉलमध्ये 6 फोर-सिक्स लगावत नाबाद 81 धावा केल्या. ज्यामुळे निर्धारीत षटकांत मध्य प्रदेशचा संघ 8 विकेट गमावत 174 धावांपर्यंत मजल मारु शकला. मुंबईकडून शार्दुल ठाकूर, रोस्टन डायस यांनी प्रत्येकी 2-2 तर अथर्व अंकोलेकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हे ही वाचा - Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये तोडगा निघाला, 'या' पद्धतीनं होणार सामने

मुंबईची डळमळीत सुरुवात, अजिंक्य-सूर्याची संयमी खेळी -

175 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवातही डळमळीतच झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ देखील स्वस्तात माघारी परतला. तो अवघ्या 10 धावा काढू शकल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात 32 धावांची भागीदारी झाली. ही जोडी मैदानावर टिकतेय असं वाटत असतानाच तिपुरेश सिंगने अय्यरला बाद केलं.

Advertisement

यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने रहाणेच्या साथीने संयमी खेळ केला. ज्यात अजिंक्यने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत सूर्यकुमारने सुंदर फटकेबाजी केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. वेंकटेश अय्यरने रहाणेला 37 रन्सवर बाद करत ही जोडी फोडली.

शेडगेची कमाल, मुंबईची धमाल -

रहाणे माघारी परतल्यानंतर मैदानात आलेला शिवम दुबेही फारकाळ मैदानात तग धरु शकला नाही. कुमार कार्तिकेयने त्याला बाद केलं. एकीकडे सूर्यकुमार यादवही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना शिवम शुक्लाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 35 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकार लगावत 48 धावा केल्या.

Advertisement

हे ही वाचा - SMAT 2024 : भर मैदानात राडा, जुने मित्र झाले वैरी! 2 दिल्लीकर एकमेकांना भिडले, Video

सूर्यकुमार बाद झाल्यानंतरही मुंबईला विजयासाठी लागणाऱ्या धावा आणि बाकी राहिलेल्या चेंडूमध्ये चांगलं अंतर होतं. परंतु शेडगेने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत हे अंतर भरुन काढलं. अखेरीस 13 बॉल शिल्लक ठेवत मुंबईने विजयासाठीचं आव्हान पूर्ण करत मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. सूर्यांश शेडगे 15 बॉलमध्ये 3 चौकार-षटकार लगावत नाबाद 36 धावा केल्या. त्याला अंकोलेकरनेही उत्तम साथ दिली.

मुंबईचं हे दुसरं विजेतेपद ठरलं. याआधी 2022-23 च्या हंगामात मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.