ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाची खराब कामगिरी अद्यापही सुरुच आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. तिसऱ्या कसोटीतही भारताचा पराभव निश्चीत मानला जात होता, परंतु वरुणराजाने भारताची लाज वाचवली. मेलबर्न येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली आहे. या संपूर्ण खराब कामगिरीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं सातत्याने अपयशी ठरणं हे आता स्पष्टपणे उठून दिसायला लागलं आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळला. यात भारताने विजय संपादीत केला. परंतु रोहितकडे नेतृत्व आल्यानंतर संघाची घडी विस्कटलेली पहायला मिळते आहे. त्यातच आपल्या धुँवाधार बॅटींगसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा संपूर्ण मालिकेत कमालीचा अपयशी ठरताना दिसत आहे. दुसऱ्या, तिसऱ्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत रोहित शर्माने फलंदाजी केली. परंतु तिकडे त्याची डाळ शिजली नाही. अशावेळी चौथ्या कसोटीत सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माकडून भारताला अपेक्षा होत्या, परंतु इथेही तो अपयशीच ठरला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित आगरकर मेलबर्नमध्ये, रोहितच्या भवितव्याचा निर्णय होणार -
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर हा सध्या मेलबर्नमध्ये आहे. यादरम्यान अजित आगरकर आणि रोहित शर्मामध्ये त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यात पात्र ठरला नाही तर सिडनी येथे होणारा अखेरचा कसोटी सामना हा रोहितचा अखेरचा कसोटी सामना ठरु शकतो.
गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने 11.07 च्या सरासरीने फक्त 155 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा - IND vs AUS: विराटनं यशस्वी जैस्वालला रन आऊट केलं? मांजरेकर-इरफान पठाणमध्ये जोरदार वाद, Video
मधल्या फळीत फलंदाजीसाठी इच्छुक नव्हता रोहित शर्मा -
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी उत्सुक नव्हता. परंतु संघाची घडी विस्कटू नये यासाठी त्याने हा निर्णय घेतला. परंतु मधल्या फळीत लय न मिळाल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी शुबमन गिलला विश्रांती देत रोहित शर्माला सलामीला संधी देण्यात आली. परंतु या सामन्यातही रोहित स्वतःला सिद्ध करु शकला नाही. पॅट कमिन्सच्या बॉलिंगवर 5 बॉलमध्ये 3 रन्स काढत तो माघारी परतला.
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत रोहित शर्माच्या नावावर फक्त 19 धावा जमा आहेत. त्यामुळे उर्वरित डावांमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघतात का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाचा - IND vs AUS : विराट कोहलीला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झालेल्या वादानंतर मिळाली शिक्षा