आयपीएलच्या आगामी हंगासाठीचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पार पडतं आहे. गेल्या काही हंगामात परदेशी खेळाडूंचं वर्चस्व लिलावात पहायला मिळत होतं. परंतू यंदाच्या हंगामात हा प्रघात मोडून काढत भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळालं. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोन खेळाडूंना पहिल्या तासाच्या लिलावात मोठी बोली लागलेली पहायला मिळाली. श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्ज संघाने तब्बल 26.75 कोटी रुपये मोजले.
आयपीएलच्या मागच्या हंगामाचा विजेता कर्णधार आहे श्रेयस अय्यर -
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या हंगामात स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. यंदाच्या हंगामात KKR ने अय्यरला संघात कायम राखलं नव्हतं, परंतु लिलावात त्याला पुन्हा संघात घेतलं जाईल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. या शक्यता काही प्रमाणात खऱ्याही ठरल्या. श्रेयस अय्यरचं नाव आल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर बोलीही लावली. परंतु या बोलीने 25 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर RTM कार्ड असतानाही KKR ने त्याचा वापर केला नाही आणि अय्यर पंजाबच्या गोटात दाखल झाला.
भारतीय संघात स्थान नाही तरीही अय्यरवर बंपर बोली का लागली?
आधी खालावलेला फॉर्म आणि नंतर दुखापत या कारणामुळे श्रेयस अय्यरने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं आहे. गेले काही महिने अय्यर स्थानिक क्रिकेट खेळत असला तरीही त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. परंतु असं असलं तरीही त्याला अनुभव आणि मधल्या फळीत त्याची आतापर्यंतची कामगिरी ही त्याला कोणत्याही संघासाठी महत्वाचा खेळाडू बनवते. याच कारणामुळे अय्यरवर इतक्या मोठ्या रकमेची बोली लागली असू शकते.
हे ही वाचा - IPL 2025 Auction : ऋषभ पंत झाला लखनऊचा नवाब; संधी असतानाही दिल्लीने का नाही लावली बोली?
IPL च्या मध्ये श्रेयस अय्यरच्या कामगिरीत सातत्य -
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरची बॅट चांगली पहायला मिळाली आहे. शेवटच्या 9 पैकी 5 सामन्यांमध्ये पंतच्या नावावर 400 पेक्षा अधिक धावा जमा आहेत. तसेच अनेक सामन्यांमध्ये श्रेयसने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मागच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या स्ट्राईकरेटमध्येही कमालीची सुधारणा झालेली पहायला मिळाली होती.
कोणत्याही जागेवर फलंदाजी करण्याची क्षमता -
श्रेयस अय्यर चांगल्या पद्धतीने बॅटींग करु शकतो यात कोणताही वाद नाहीये. परंतु मधल्या फळीत कोणत्याही स्थानावर खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. अनेकदा श्रेयस अय्यर मोक्याच्या क्षणी अखेरपर्यंत टिकून खेळत नाही अशी टीका होते. परंतु चांगल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली यावर उपाय शोधला जाऊ शकतो. पंजाब किंग्जमध्ये रिकी पाँटींगच्या मार्गदर्शनात श्रेयस अय्यरच्या खेळात कमालीचा बदल पहायला मिळू शकतो. म्हणूनच अय्यरवर इतक्या मोठ्या रकमेची बोली लावली गेली असू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world