आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed mass conversion: बीड जिल्ह्याच्या राजकारणासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी एक घटना उघड झाली आहे. वडवणी शहरात पैशांचं आमिष दाखवून 100 हून अधिक महिला-पुरुषांचं सामूहिक धर्मांतर (Mass Conversion) केलं जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला आहे. रविवार, 19 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेला धर्मांतराचा हा कथित प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला. याप्रकरणी पास्टर दिनेश लोंढे (Pastor Dinesh Londhe) यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
वडवणी शहरात कानपूर रस्त्याजवळ असलेल्या एका खासगी सभागृहात रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वडार, कैकाडी, भोई , शीख धर्मातील शिकलकरी बांधवांसह इतर धर्मातील महिला आणि पुरुषांना बोलावण्यात आले होते. त्यांना ख्रिश्चन (Christian) धर्म स्वीकारण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात होते, असा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आरोप आहे.
धर्मांतर केलं जात असल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे काही शिवसैनिक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कार्यक्रमाला विरोध करत गोंधळ घातला आणि धर्मांतराचा हा प्रयत्न थांबवला. यावेळी झालेला वाद-विवादाचा व्हिडीओदेखील सध्या चर्चेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पास्टर दिनेश लोंढे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
( नक्की वाचा : Beed : बीड कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव? शिवाजी महाराजांची मूर्तीही हटवली, बड्या अधिकाऱ्यावर आरोप )
दोन वर्षांपासून धर्मांतराचा 'कार्यक्रम'?
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार, बीडमध्ये गेल्या 2 वर्षांपासून अशाप्रकारे धर्मांतराचे काम सुरू आहे. दर रविवारी एका हॉलमध्ये वडार, कैकाडी, भोई आणि शीख धर्मातील लोकांना बोलावले जाते आणि त्यांना प्रलोभन देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. गेल्या रविवारी झालेल्या कार्यक्रमाला सुमारे 100 लोक उपस्थित होते, असेही सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते विनायक मुळे (Vinayak Mule) यांनी दिला आहे. दुसरीकडे, पास्टर दिनेश लोंढे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण फक्त बायबलवर प्रवचन देत होतो, असा त्यांचा दावा आहे.
धर्मांतर बंदी कायद्याची मागणी
बीडमध्ये झालेल्या या घटनेनंतर राज्यात धर्मांतर बंदी कायदा (Anti-Conversion Law) लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी बोलताना, अशा धर्मांतराच्या घटना लवकरात लवकर थांबवण्यासाठी लवकरच धर्मांतर बंदी कायदा आणला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वी जिल्हा कारागृहात कैद्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड (Peters Gaikwad) यांची तडकाफडकी बदली नागपूर कारागृहात कारागृह उपाधीक्षकपदी करण्यात आली होती.
'धर्मांतर प्रतिबंध कायदा' लवकरच येणार?
महाराष्ट्रामध्ये बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने धर्मांतर प्रतिबंध कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे आमदार आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. भाजप नेत्यांच्या मते, कुणीही धर्मांतर करण्यापूर्वी 15 दिवस आधी स्थानिक प्रशासनाला याबाबत कळवावे.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली होती की, महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा (Anti-Conversion Law) आणण्याबाबत किंवा सध्याचा कायदा अधिक कठोर करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom of Religion) दिला आहे, परंतु बळजबरीने किंवा प्रलोभनाने धर्मांतर केल्यास कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. धर्मांतर प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तरतूद याआधीच अनेक राज्यांनी केली आहे.
सध्या वडवणी गावात नेमका काय प्रकार सुरू होता, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीनंतरच या कथित धर्मांतर प्रकरणातील सत्य बाहेर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world