आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आला असून या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीररीत्या खालावली. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र चौकशीअंती संबंधित तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचं उघड झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
नियमांना बगल देत शस्त्रक्रिया...
गर्भपातासाठी शासनाने घालून दिलेले नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, उपचारानंतर संबंधित तरुणीचा पत्ता लागत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून माजलगाव येथील संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात पती, सासू, सासरे आणि पीडितेच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world