
Bhiwandi Doctor dies due to pothole : मुंबई आणि उपनगरात सद्यस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांचा आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वाहतूक कोडींमागे महत्त्वाचं कारण खड्डेच आहेत. अशा या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कित्येक तास प्रवासात जातात. अनेकांना या खड्ड्यांमुळे पाठीचं दुखणंही सुरू झालंय. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही यामुळे मोठ्या अपघाताची भीती असते. आता या खड्ड्यांमुळे एका डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे.
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटलजवळ शुक्रवारी रात्री एक अपघात घडला. डॉक्टर नसीम अन्सारी ढाब्यावर जेवण करून त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांच्या बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायरने त्यांना (Doctor dies due to pothole) चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांकडून याबाबत संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. डॉक्टरांच्या मृत्यूला कोण जबाबदार असाही त्यांचा सवाल आहे.
नक्की वाचा - Nagpur News : ना शाळेची इमारत, ना विद्यार्थी, ना शिक्षक; तरीही 2 वर्षे सुरू होती शाळा, काय आहे भयंकर प्रकार?
एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात येत होती आणि त्यांना रस्त्यावरून जाण्याची व्यवस्था करण्यात येत होती. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जड वाहनांची ये-जा असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला होता. या घटनेनंतर नागरिकांचा पालिकेबद्दलचा रोष स्पष्टपणे दिसून आला. रस्त्याची खराब स्थिती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरुद्ध लोकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world