जाहिरात

'तुमचं कुरियर आलंय..'ज्येष्ठ नागरिकाला 5 दिवस केलं ब्लॅकमेल करत 1.3 कोटी लुबाडले!

Cyber Crime : या महिलेला सलग पाच दिवस ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. 

'तुमचं कुरियर आलंय..'ज्येष्ठ नागरिकाला 5 दिवस केलं ब्लॅकमेल करत 1.3 कोटी लुबाडले!
Noida Crime (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

सायबर गुन्हेगारीचं (Cyber Crime) प्रमाणात हल्ली मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.हे गुन्हेगार जगातील कोणत्याही कोपऱ्यातून तुमची फसवणूक करु शकतात. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तर या गुन्हेगारांचं हमखास टार्गेट असतं.त्यांना असलेली तंत्रज्ञानाची अपुरी माहिती मनातील असुरक्षितता, वयमानोपरत्वे बदलत असलेला स्वभाव या सर्वांमुळे त्यांची फसवणूक करणे सोपे होते. राजधानी दिल्ली जवळच्या नोएडामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. नोएडामधील 73 वर्षांच्या महिलेला सलग पाच दिवस ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. 

या गुन्हेगारांनी 13 जून पासून 5 दिवस या महिलेला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 'डिजिटल अरेस्ट'केलं होतं. पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा बहाणा करत त्यांनी महिलेची फसवणूक केली.त्यांनी त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाखांची फसवणूक केली.आरोपीनं या महिलेला मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभागी होण्याची भीती दाखवली. त्यामुळे त्यांना या पाच दिवसांमध्ये कुणालाही काही सांगण्याची हिंमत झाली नाही.

कसा केला छळ?

सूची अग्रवाल असं या पीडित महिलेचं नाव आहे.त्यांना गुन्हेगारांनी 13 जून रोजी मुंबईच्या अंधेरीतील कुरियर फर्ममधून बोलत असल्याचा फोन केला.'आम्हाला एक पार्सल मिळालंय.त्यामध्ये आक्षेपार्ह सामान आहे.' असं त्यांनी महिलेला सांगितलं.त्यानंतर दुसऱ्या गुन्हेगारानं स्वत:ला तपास अधिकारी असल्याचं भासवत महिलेला मुंबईला येण्याचा आदेश दिला.आमचं ऐकलं नाही तर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) तुमची चौकशी करेल, अशी भीती दाखवली. त्यानंतर या महिलेनं कुटुंबीयांना याबाबत काहीही सांगितलं नाही, आणि 5 दिवसांमध्ये त्यांना 1 कोटी 30 लाख ट्रान्सफर केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अग्रवाल यांनी या प्रकरणात गुरुवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस अधिकारी विवेक रंजन यांनी सांगितलं की, 'त्यांना एका अज्ञात मोबाईल नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्यानं सांगितलं की,

'तुमच्या नावाचं एक अवैध पाकिट जप्त करण्यात आलं आहे. कुरियरमध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डसह पासपोर्टची माहिती आणि काही अवैध गोष्टी सापडल्या आहेत. तुमचा हवालामध्ये सहभाग आढळलाय.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तुम्हाला मुंबईमध्ये यावं लागेल.' तुमच्या प्रकरणाचा तपास एनसीबी मुंबईकडं सोपवण्यात आलाय.'

( नक्की वाचा : '15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये )
 

महिलेकडून कसे लुटले 1.3 कोटी ?

या प्रकरणात सहभागी असलेला आणखी एका आरोपीनं अग्रवाल यांना संपर्क केला. त्यानं 'तुम्हाला कोणत्याही कायदेशीर कारवाईत अटकायचं नसेल तर एक मिनिटासाठीही हा फोन डिस्कनेक्ट करु नका. त्याचबरोबर कुणालाही याबाबत सांगू नका,' अशी धमकी दिली.

अग्रवाल यांनी भीतीमुळे पाच दिवसामध्ये एकदाही या गुन्हेगारांचा फोन कट केला नाही. त्यांनी या दरम्यान घरातील किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा फोन घेतला नाही

. त्यांना नेट बँकिंगचं ज्ञान होतं. त्यानंतर त्यांनी पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं 1 कोटी 30 लाख रुपये गुन्हेगारांना ट्रान्सफर केले. या प्रकरणातील संदिग्ध आरोपींनी चौकीशीच्या बहण्यानं त्यांच्याकडून बँक बॅलन्सची माहिती काढून घेतली होती. 

या भामट्यांनी पाच दिवसानंतर त्या महिलेचा फोन डिसकनेक्ट केला. तुम्हाला पुढच्या 24 तासांमध्ये पोलिसांकडून क्लियरन्स सर्टिफिकेट मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पण,  अग्रवाल यांना असं कोणतंही प्रमाणपत्र मिळलं नाही. त्याचबरोबर सर्व आरोपींचे मोबाईलही बंद होते. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.अग्रवाल यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर दोघांनी गुरुवारी क्राईम ब्रँचमध्ये धाव घेतली. 

( नक्की वाचा : पोलिसांनी लक्ष दिलं असतं तर आरती वाचली असती! वसई हत्याकांडात धक्कादादायक माहिती उघड )
 

या महिलेच्या तक्रारीनंतर सायबर क्राईम ब्रँचनं अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. पीडित महिला नोएडामधील सेक्टर 49 मध्ये त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात.त्यांनी फसवणूक झाल्यानंतर सायबर पोलिसांकडं मदतीसाठी धाव घेतली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (सायबर क्राईम) विवेक रंजन यांनी दिली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com